Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे घर हे भांडण, वाद, बाचाबाची यांसाठी जितकं ओळखलं जातं, तितकंच ते कॅप्टन्सीसाठीही ओळखलं जातं. ‘बिग बॉस’च्या खेळात कॅप्टन पद अतिशय महत्त्वाचे मानलं जातं. कॅप्टन असलेल्या व्यक्तीकडे विशेषाधिकार असतात. त्याशिवाय कॅप्टनचा एका आठवड्याच्या नॉमिनेशनपासून बचावही होतो. तसंच कॅप्टन म्हणून त्याच्याकडे अनेक जबाबदाऱ्याही असतात. कॅप्टनला घरातील निर्णय घेण्याचे अधिकार मिळतात. त्यामुळे ज्या टीममधील सदस्य कॅप्टन होईल, त्या टीमलादेखील त्याचा फायदा होतो. मात्र बिग बॉसचे घर हे अनेक ट्विस्टसाठी ओळखलं जातं. या घरात रोज नवनवीन ट्विटस येत असतात. अशातच घरात एक नवीन ट्विस्ट आला आहे तो म्हणजे अरबाजच्या कॅप्टन्सीचा. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर झाली होती. त्यानंतर दुसरा कॅप्टन कोणता सदस्य होणार?, यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात फारच रोमांचक टास्क पार पडला. यानंतर अखेर अरबाज पटेल हा दुसरा कॅप्टन ठरला. पण आता अरबाजच्या कॅप्टन्सीवर टांगती तलवार असल्याचं समोर आलं आहे. अरबाजला त्याचे कॅप्टन पद गमावू लागण्याची शक्यता आहे असं या नवीन प्रोमोमधून पाहायला मिळत आहे.
कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. यातून अरबाज पटेलच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं दिसत आहे. या नवीन प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ अरबाजला म्हणत आहेत, “अरबाज बीबी करन्सीद्वारे दोन्ही टीम्ससाठी सोईसुविधा विकत घेऊ शकतात. त्याबदल्यात तुम्हाला आपलं कॅप्टन पद गमवावं लागेल. आता आपल्याला आपला फायदा निवडायचा आहे किंवा घराचा फायदा”.
यामुळे त्याच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. त्यामुळे अरबाज आता घराचा फायदा निवडणार की स्वत:चा फायदा निवडणार हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, अरबाज कॅप्टन पद गमावणार असल्याने निक्की मात्र हैराण झाली आहे. अरबाजने कॅप्टन्सी गमावल्यास टीम A ला मोठा फटका बसणार आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे टीम A च्या सदस्यांच्या चेहऱ्यावर ही भीती दिसून येत आहे.