Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा सध्या सगळीकडे बोलबाला आहे. या शोने आतापर्यंत तीन आठवडे पूर्ण केले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये घरातील सदस्यांचे प्रत्येक प्रसंगांनुसार विविध रंग पाहायला मिळाले. कोणी शाब्दिक मर्यादा ओलांडली तर कोणी अगदी हाणामारीवर उतरलं. आठवड्याभरात घरात स्पर्धक काय गोंधळ घालतात?, कसा खेळ खेळतात? याचा संपूर्ण आढावा रितेश देशमुख ‘भाऊच्या धक्क्या’वर घेतो. याचीच एक झलक आता समोर आली आहे. भाऊच्या धक्क्याचा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये रितेश वैभवची चांगलीच शाळा घेताना दिसत आहे. या आठवड्यामध्ये त्याच्याकडून झालेल्या चुका विरुद्ध टीमशी केलेली गद्दारी याबाबत बोलताना दिसत आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
बिग बॉस मराठी ५च्या ‘भाऊचा धक्का’चा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला असून या नवीन प्रोमोमधून रितेशचा एक नवीन अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश “घरात गद्दार कोण आहे?” असा प्रश्न अरबाजला विचारतो. यावर अरबाज वैभवचं नाव घेतो. यानंतर रितेश वैभवला उद्देशून “तुम्ही जर असं म्हणाला असतात की, मला तुम्ही तुमच्या टीमचा समजू नका. हे बोलायला जिगर लागते. ते बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात नाही मिळत. आम्ही ‘बिग बॉस’च्या घरात वैभव पाठवला आहे. गद्दार म्हणून बाहेर येऊ नका”.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील तिसरा आठवडा चांगलाच गाजला. कॅप्टन्सीसाठी सदस्यांनी एकमेकांची लायकी तर काढलीच, पण त्याचबरोबरीने अक्षरशः काही सदस्य हाणामारीपर्यंत पोहोचले. कॅप्टन्सीसाठी दोन टीम करण्यात आल्या. यामध्ये वैभव हा निक्की-अरबाज यांच्या विरुद्ध टीममध्ये होता. पण तो यादरम्यान त्याला देण्यात आलेल्या टीमबरोबर प्रामाणिकपणे खेळला नाही. हे संपूर्ण महाराष्ट्रानेही पाहिलं. त्यामुळे टीमशी गद्दारी केल्याबद्दल रितेशने वैभवला सुनावल्याचे या नवीन प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. हा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्यांना हा प्रोमो आवडल्याचे मतं व्यक्त केलं आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील ‘भाऊचा धक्का’ रितेश देशमुख चांगलाच गाजवत आहे. ‘भाऊच्या धक्क्या’वर सदस्यांची शाळा घेणं असो, आठवड्याभरातील सदस्यांच्या वागणुकीवर त्याने घेतलेली हजेरी असो किंवा आपल्या हटके स्टाईलने सदस्यांचं भरभरून केलेलं कौतुक असो… एक ‘भाऊचा धक्का’ संपल्यावर दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावर काय होणार? याची ‘बिग बॉस’ प्रेमींमध्ये असणारी उत्सुकता हेच या नव्या सीझनच्या यशाचं गुपित आहे.