Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सध्या चांगलंच गाजताना दिसत आहे. या घरातील टास्कमुळे व नवनवीन सदस्यांमुळे पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे. या घरात एकूण १५ स्पर्धकांनी प्रवेश घेतला असून यात नेते, अभिनेते ते सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्स अशा अनेकांचा समावेश आहे. यातील अरबाज पटेल हे नाव शोच्या पहिल्या दिवसापासूनच गाजत आलेलं नाव आहे. अरबाजने बिग बॉस मराठीच्या प्रीमियर सोहळ्यातच अनेकांची मनं जिंकली होती. त्यानंतरच्या त्याच्या आक्रमक खेळीनंतर तो कायमच चर्चेचा विषय ठरला. बिग बॉसच्या घरात हवा करणारा अरबाजच्या खऱ्या आयुष्याबद्दल फारच कमी जणांना माहिती आहे.
मूळचा औरंगाबादचा अरबाज हा सोशल मीडियावर इन्फ्ल्युएन्सर, मॉडेल आणि अभिनेता म्हणून लोकप्रिय आहे. अरबाजचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत. याआधी तो ‘स्प्लिट्सविला’सारख्या शोमधूनही चाहत्यांच्या भेटीला आला आहे. त्याचबरोबर त्याने काही म्यूझिक व्हिडीओमध्येही कामं केलं आहे. यासह अरबाजचे एक कपड्यांचे दुकानही आहे. सोशल मीडियावर सध्या अरबाजचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अरबाज स्वत: त्याच्या दुकानातले कपडे विकत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अरबाज त्याच्या दुकानातील नवनवीन कपडे नेटकऱ्यांना दाखवत असून त्याच्या दुकानात पुरुषांचे अनेक शर्ट व पॅंट आहेत. अरबाजचे हे स्वत:चे दुकान असून या दुकानाचे नाव ‘पटेल मेन्स वेअर’ असं आहे. अरबाजच्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी काही मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. या व्हिडीओखाली एकाने “म्हणूनच हा ‘स्पिट्सविला’मध्ये अनेक कपडे घेऊन आला होता वाटत” असं म्हटलं आहे. तसंच अनेकांनी त्याच्या या व्यवसायानिमित्त कौतुकही केलं आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात अरबाज निक्कीमुळेच अनेकदा चर्चेत आला आहे. त्याच्या निक्कीबरोबरच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. अरबाजने निक्कीसाठी टोमॅटोचं हृदय बनवलं, घनःश्यामने निक्कीला वहिनी हाक मारणं, अरबाजने स्वतःची कॅप्टन्सी सोडत निक्कीला कॅप्टन्सी देणं. बीबी करन्सी वापरून निक्कीला सेफ करणं अशा बऱ्याच गोष्टी त्याने निक्कीसाठी केल्याचे दिसून आलं आहे.