‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या सीझनमध्ये सर्वांत गाजलेली जोडी म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. ‘बिग बॉस’च्या घरात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलच्या जवळीकीची मोठी चर्चा झाली. बिग बॉसच्या घरात दोन ग्रुप तयार झाले होते. त्यातील ए ग्रुपमध्ये निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण व अरबाज पटेल हे सदस्य होते. काही काळानंतर या ग्रुपमध्ये भांडणे झाली आणि त्यांच्यात फूट पडली. अरबाज आणि निक्कीमध्येदेखील मोठे भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले. त्यांच्या जवळीकीची मोठी चर्चा झाली. कारण- अरबाजने ‘बिग बॉस’च्या घरात अरबाजने तो बाहेर ‘कमिटेड’ असल्याचे म्हटले होते. (Arbaaz Patel on Nikki Tamboli using him)
पण कालांतराने अरबाज बिग बॉसमधून बाहेर आला आणि त्याने निक्कीसाठी आधीचे नाते संपवल्याचेही म्हटलं. त्याने निक्कीची समजूतही काढली. यावर निक्कीनेदेखील त्याचा स्वीकार केल्याचे भाष्य बिग बॉसच्या घरात केले. यादरम्यान, गेमसाठी ते एकमेकांचा वापर करीत असल्याचे म्हटले गेले. अनेकांना बिग बॉसच्या घराबाहेर त्यांचे नाते असणार आहे का, असाही प्रश्न पडला होता. यावर आता अरबाजने भाष्य केलं आहे.
गेमसाठी एकमेकांचा वापर केल्याच्या चर्चांवर अरबाजने असं म्हटलं की, “पहिली गोष्ट म्हणजे, असं शब्द समोर आले नाहीत की अरबाजने निक्कीला वापरलं आहे. सगळीकडे असंच म्हटलं जात आहे की, निक्कीने गेमसाठी अरबाजचा वापर केला. जर अरबाज स्वतंत्रपणे खेळला तर अजून चांगला दिसेल. तर मी हेच बोलेन की, ना निक्कीने माझा वापर केला आहे किंवा ना मी तिचा वापर केला आहे. मी माझाच गेम खेळत होतो. मग तो घरातील कोणता टास्क असो किंवा इतर मुद्दा”.
यापुढे अरबाजने असं म्हटलं की, “निक्की माझ्याबरोबर होती तर माझी दुसरी बाजूही तुमच्या (प्रेक्षकांपुढे) आणली. माझ्या भावना आणि माझा सांभाळून घेण्याचा स्वभाव हा निक्कीमुळे तुमच्या पुढे आला आहे”. अरबाज पटेल बिग बॉसमध्ये सहभागी होण्याआधी ‘स्पिलट्सव्हिला १५’मध्ये सहभागी झाला होता. त्या शोमध्ये त्याची पार्टनर असलेल्या नायराने त्याच्यावर काही आरोप केले होते. अरबाज शोसाठी मुलींचा वापर करतो, असे तिने म्हटले होते.
दरम्यान, अरबाजचा त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर साखरपुडा झाला आहे अशा चर्चाही सोशल मीडियावर झाल्या होत्या. त्यामुळे निक्कीबरोबरची त्याची जवळीक पाहून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले होते. पण या सगळ्या माझ्याबद्दलच्या अफवा असल्याचे अरबाजने स्वत: सांगितलं आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस मराठी’नंतर निक्की आणि अरबाजच्या करिअरची पुढची वाटचाल कशी असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.