गेले अनेक महिने छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वाची चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता सलमान खानच्या खांद्यावर असलेली बघायला मिळत आहे. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर पार पडला. सुरुवातीला यामध्ये एकूण १७ सदस्य सहभागी झाले होते. दिवसेंदिवस या कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. तसेच ‘बिग बॉस’च्या घरात चुरशीचा खेळ सुरु झाला. १७ सदस्यांपासून सुरु झालेला हा खेळ आता सहा स्पर्धकांवर येऊन थांबला. या सहा स्पर्धकांमध्ये विवियन डिसेना, करणवीर मेहरा, चुम दरांग, अविनाश मिश्रा, ईशा सिंह व रजत दलाल हे बाकी होते. त्यामुळे यापैकी विजेता नक्की कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. (bigg boss 18 winner)
अनेक दिवसांच्या खेळानंतर अखेर विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘बिग बॉस १८’ च्या विजेतेपदावर करणवीर मेहराने आपलं नाव कोरलं असून सलमानने विजेत्याचे नाव घोषित केले. या स्पर्धकाच्या विजयाने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असलेले बघायला मिळत आहे. ‘बिग बॉस १८’ च्या विजेत्याला ‘बिग बॉस’ची ट्रॉफी मिळाली असून ५० लाख रुपये रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उर्वरित सहा सदस्यांना घरच्यांनी तसेच त्यांच्या चाहत्यांनी किती आणि कसा पाठिंबा दिला? याबद्दल दाखवण्यात आले. चाहत्यांचा मिळालेला पाठिंबा बघून सगळ्याच सदस्यांचे डोळेदेखील पाणावलेले बघायला मिळाले. त्यानंतर एलिमिनेशनला सुरुवात झाली. या घरातून सुरुवातीला ईशा सिंहला बाहेर पडावं लागलं. त्यानंतर चुम दरांगने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. अविनाशला टॉप ४ मधून बाहेर पडाव लागलं.
विवियन, रजत व करणवीर यांनी टॉप ३ मध्ये मजल मारली होती. रजतदेखील टॉप ३ मधून बाहेर पडला. मात्र चाहत्यांनी करणवीरला अधिक पाठिंबा देत विजेता केलं. करणवीर विजेता झाल्यामुळे त्याच्या चाहत्यांमद्धे उत्साहाचे वातावरण असलेले बघायला मिळाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.