Hema Sharma Bigg Boss 18 : ‘बिग बॉस १८’ मधून घराबाहेर पडलेली हेमा शर्मा पहिली स्पर्धक होती. मनोरंजक गोष्ट म्हणजे शोमधून बाहेर पडणे यापेक्षा अभिनेत्रीच वैयक्तिक आयुष्य वादग्रस्त ठरले आहे. खरं तर, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर काढल्यानंतर हेमाने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि दोन अयशस्वी विवाहांबद्दल उघडपणे भाष्य केले. शिवाय हेमापासून वेगळे झालेले पती गौरव सक्सेना यांनी तिच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आलेली ही व्हायरल भाभी अधिक लोकप्रिय झाली. असं असलं तरी सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
‘टेली चक्कर’ला दिलेल्या मुलाखतीत, हेमाचे पती गौरवने खुलासा करत म्हटलं की, हेमाने त्याला सांगितले होते जर त्याने तिला घर दिले तर ती त्याला मुलाचा ताबा लिखित स्वरुपात देईल. गौरव म्हणाला की, याचा अर्थ एक आई तिच्या मुलाचा अडीच कोटी रुपयांच्या बदल्यात त्याला मिळवून देण्याचा करार करत होती. गौरव पुढे म्हणाला की, ‘बिग बॉसमध्ये जाण्यासाठी हेमाने तिच्या अडीच वर्षांच्या मुलाचीही काळजी घेतली नाही’. त्यांनी हेमाला कलियुगी आई म्हटले. गौरवने पुढे खुलासा केला की. ‘त्याने हेमाचे यूट्यूब चॅनल युगांडामध्ये सुरु केले आहे. पण ती मुंबईला परतल्यावर सगळंच बदललं’.
गौरवने पुढे सांगितले की, ‘त्याची योजना अशी होती की तो नोकरी सोडून अलीगढमध्ये वृद्धाश्रम चालवणार आहे. पण हेमाने स्पष्टपणे सांगितले की, ती अलीगढला जाणार नाही आणि फक्त व्हिडीओ बनवण्यासाठीच येणार आहे’. लोकांच्या सहानुभूतीसाठी तो वृद्धाश्रमाचा व्हिडीओ बनवू देणार नाही, असं गौरवने हेमाला स्पष्ट सांगितलं. त्याच दिवसापासून दोघांमध्ये वाद सुरु झाला. जेव्हा गौरवला विचारण्यात आले की, ‘हेमा मध्यरात्री घरुन निघून जाते आणि तिची कंपनी चांगली नाही असे तो का म्हणाला होता?’. यावर गौरवने सांगितले की, ‘हेमाची मुलं लहान आहेत, त्यामुळे मुलांवर नकारात्मक परिणाम होईल म्हणून त्याला याविषयी सविस्तर बोलायचे नाही’.
हेमानेही गौरवच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “त्या माणसाला हे पचवता येत नाही की, मी ज्या महिलेला बिनधास्त सोडले ती ‘बिग बॉस’मध्ये पोहोचली आहे. त्याला फक्त प्रसिद्ध व्हायचे होते. त्याला सेलिब्रिटीचा नवरा म्हणून मिरवायचे होते. मी काम करावे अशी त्याची इच्छा होती. आणि माझ्या खर्चासाठी मला पैसे कमावणं भाग होतं याची मला जाणीव झाली. त्यामुळे तुझ्याशी लग्न का केले?, हा प्रश्न मला पडला”.