ठाण्यातील घोडबंदर रोड हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून रोज लाखोंच्या संख्येत वाहनांची वर्दळ असते. याच मार्गावरुन मुंबई, पालघरसह गुजरातमध्ये जाणाऱ्या गाड्यांची ये-जा सुरु असते. अत्यंत महत्वाच्या या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. यामुळे या मार्गावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या अनेकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सामान्य जनतेसह मराठी मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या कलाकरांनाही या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याबद्दल अनेकदा अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच अभिनेता अभिजीत केळकरनेही घोडबंदर रोडवरील ट्रॅफिक संदर्भात मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. (Abhijeet Kelkar on Thane Ghodbunder Road Traffic)
अभिनेता अभिजित केळकरला ठाणे शहर आणि परिसरातील वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला असून यात तो दीड तास अडकला. ठाण्यातील रहदारीचा अनुभव घेतल्यानंतर अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट लिहीत आपली खदखद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल अभिजीतने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “आज शूटिंगचा साडेआठचा कॉल टाईम होता. साडेसात वाजता घरुन गुगल मॅप बघून निघालेला मी गेल्या दीड तास घोडबंदर रोडवरच्या घाटाच्या ही बराच आधी असलेल्या शेल पेट्रोल पंपच्या इथे बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. ट्रॅफिक कधी सुटणार? आणि शूटिंगला आपण कधी पोहोचू शकणार? हे माहीत नाही”.

आणखी वाचा – घरोघरी मातीच्या चुली! आलिया भट्टने स्वतःच्याच नणंदेला म्हटलं चुगलीखोर, सतत गॉसिप करते आणि…
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “या गोंधळलेल्या परिस्थितीत, घाणेरड्या रस्त्यांमुळे आणि बेशिस्त ट्रक चालकांमुळे, एखादा ट्रक किंवा ट्रॉलर उलटून त्याच्याखाली माझा मृत्यू झालाच आणि माझ्या पश्चात त्या ठिकाणाला चुकून माकून माझं नाव द्यायचा विचार झालाच तर माझा उल्लेख, ‘अभिनेता’ अभिजीत केळकर असा न करता ‘चांद्र मोहीमवीर’ अभिजीत केळकर असा करावा ही विनंती”. अभिजीतच्या या पोस्टखाली नेटकऱ्यांनीही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आणि या प्रतिक्रियांमधुन त्यांनीदेखील या रस्त्याबद्दलची आपली व्यथा सांगितली आहे.
अभिजीतच्या या पोस्टखाली नेटकऱ्यांनी “मी रोज या रस्त्याने जाते, उशीर झाला की माझे पैसेही कट होतात, या रस्त्यासाठी अजून २ वर्षे लागतील”, “मुंबई-ठाण्यातील ट्रॅफिक फारच प्रमाणात वाढली आहे. अर्धा पाऊण तासाच्या प्रवासाला आत्ता दीड ते दोन तास लागत आहेतं” अशा प्रतिक्रियांमधुन नेटकऱ्यांनी अभिजीतला दिलासा देण्याचे काम केले आहे. दरम्यान, अभिजीतने नुकतीच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत केदार म्हणून एन्ट्री केली आहे.