‘बिग बॉस’चे १७वे पर्व नुकतेच पार पडले असून या पर्वाचा महाअंतिम सोहळा मोठ्या धूमधडाक्यात झाला. महाअंतिम सोहळ्यात मुनव्वर फारुकीने विजेते पदावर आपले नाव कोरले. मुनव्वर हा या घरात येण्याआधीच लोकप्रिय होता. पण ‘बिग बॉस’चे विजेतेपद पटकावल्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत व प्रसिद्धीमध्ये आणखीनच वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे आणि याचा प्रत्यय नुकताच तो राहत असलेल्या ठिकाणी अर्थात डोंगरीमध्ये झालेल्या गर्दी पाहून आला.
शो जिंकल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुनव्वर हा त्याच्या राहत्या ठिकाणी म्हणजेच मुंबईमधील डोंगरी परिसर येथे पोहोचला. येथे मुनव्वरची एक झलक पाहण्यासाठी लोकांची तूफान गर्दी झाली होती. डोंगरीमध्ये मुनव्वरला पाहण्यासाठी मोठा जनसमुदाय उसळला होता. याचे काही फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले असल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर या गर्दीने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्याला पाहायला आलेल्या या गर्दीवरुन मुनव्वरची त्याच्या चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ दिसून येते.
पण याच गर्दीमुळे मुनव्वर आता वादात आला आहे. मुनव्वर आला त्यादिवशी मुनव्वरला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी ड्रोन उडवण्यात आला होता. पण ड्रोन ऑपरेट करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधित एक अहवाल समोर आला आहे. ज्यानुसार, पोलिसांनी ऑपरेटर युसूफ खानविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. मुनव्वरचा हा कार्यक्रम ड्रोनने चित्रित करण्यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती आणि त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात असताना मुनव्वर हा अनेक कारणांनी चर्चेत आल्याचे पहीला मिळाले. या घरात त्याच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. आयशानेदेखील मुनव्वरच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक गंभीर खुलासे केले. त्यानंतर बिग बॉसच्या घराबाहेर येऊनही त्याच्याविषयी वादात आणखी एक भर पडली आहे.