Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’चा ग्रँड फिनाले अगदी जवळ आला आहे. मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण मशेट्टी, अंकिता लोखंडे या पाच स्पर्धकांची नजर ‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीवर आहे. आता नेमका कोणता स्पर्धक या ट्रॉफीवर नाव कोरणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशातच शेवटच्या एलिमिनेशन राउंडमध्ये विकी जैनचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला. त्यामुळे त्याची पत्नी अभिनेत्री अंकिता लोखंडे भावुक झालेली पाहायला मिळाली. अंकिताला यावेळी अश्रू अनावर झाले.
विकी घरातून गेल्यामुळे अंकिता लोखंडे एकटी पडली आहे. अशातच नुकत्याच समोर आलेल्या भागात अंकिता घराबाहेर पडल्यानंतर बाहेर जाऊन पाच दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याबद्दल बोलली आहे. पण, सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती नेमकं काय तपासणार, याबाबत अभिनेत्रीने खुलासा केला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर जाताना अंकिताने विकीला पार्टी करु नकोस असे वारंवार बजावून सांगितलं होतं. मात्र आता समोर आलेल्या फोटोंवरुन तो पार्टी करत असल्याचे दिसत आहे. जेव्हा अंकिताला ही गोष्ट कळेल तेव्हा या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण होणार हे नक्की.
विकी जैनला घरातून बाहेर काढले जात असताना अंकिता लोखंडेने त्याला एकट्याने पार्टी करण्यास मनाई केली आहे. ‘बिग बॉस १७’च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये असे दाखवण्यात आले की, जेव्हा अंकिता लोखंडे, मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार व अरुण माशेट्टी ‘बिग बॉस’च्या गाण्यावर डान्स करत होते, तेव्हा अंकिता विकीला मिस करताना दिसली. यावेळी अभिषेक तिला चिडवत म्हणाला, “विकी भाई यावेळी झोपयाला जात असेल का?”, अंकिता अभिषेकशी सहमत होते आणि म्हणते, “मलाही वाटते की तो कदाचित पार्टी करत असेल”.
मन्नारा व अभिषेक अंकिताला म्हणतात, “विकी भाईने त्याच्या सर्व मित्रांना पार्टीसाठी त्याच्या घरी बोलावले असेल”. यावर उत्तर देताना अंकिता म्हणते, “माझ्या घरी कोणाला येण्याची परवानगी नाही. या पाच दिवसांत माझ्या घरी कोण कोण आले, याचे पूर्ण रेकॉर्डिंग मी जाऊन बघेन”. अंकिताचे हे बोलणे ऐकून मन्नराला आश्चर्य वाटते. अंकिता बोललेली बाजू सांभाळत म्हणते की, “असे काही घडले तर याचा अर्थ मला संशय आला तर मी फुटेज चेक करेन”.