प्रत्येक कलाकाराला मेहनतीने, जिद्दीने सिनेसृष्टीत आपलं नाव कमवावं लागतं. बऱ्याच कलाकारांना कोणताही वारसा नसताना ही कलाकार मंडळी त्यांच्या स्वबळावर सिनेसृष्टीत यश संपादन करतात. या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीचं नाव नक्की घेतलं जाईल ती म्हणजे अंकिता लोखंडे. आजवर या अभिनेत्रीने हिंदी मालिकाविश्वात स्वतःच नाव स्वतः कमावलं आहे. अंकिताने आजवर तिच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. आजही अंकिता यशाच्या शिखरावर असली तरी तिला तिच्या कष्टाच्या दिवसांची जाणीव आहे. (Ankita Lokhande Struggle)
‘बिग बॉस १७’मध्ये अंकिता लोखंडे स्पर्धक म्हणून पाहायला मिळतेय. तिच्या ‘बिग बॉस’च्या घरातील खेळाचंही सर्वत्र कौतुक केलं जात आहे. ‘बिग बॉस’मध्ये तिने तिचा पती विकी जैनसह सहभाग घेतला आहे. हे बॉलिवूड कपल ‘बिग बॉस’च्या घरात चर्चेत असताना दिसते. अशातच अंकिताने मुन्नवरसह गप्पा मारताना तिच्या कष्टाच्या दिवसांबद्दल भाष्य केलं आहे. अगदी मुंबईत आल्यानंतर सुरु झालेला प्रवास ते मिळणारा पर डे याबद्दलच्या कटू आठवणी तिने मुन्नवरसह बोलताना शेअर केल्या आहेत.
अंकिता म्हणाली, “मला १७ वर्ष पूर्ण झाली आणि मी १८व्या वर्षी मुंबईत आले. पण मी खूप हुशार होते. कोणी मला वेड्यात काढू नये म्हणून मी नेहमीच सतर्क असायचे. मी इतरांप्रमाणे नाही बोलायचे की, मी हे करेन, ते करेन. मला माहित होतं, मला काय करायचं आहे. मुनव्वर, माझ्यावर एकवेळ अशी होती की, माझ्याकडे खरोखरचं पैसे नसायचे. मला असं वाटायचं की, मी कसं काय माझं पोट भरणार आणि कशी ऑडिशनला जाणार? आणि अशी वेळही माझ्या आयुष्यात येऊन गेली. कारण मी आई-वडिलांवर किती दिवस अवलंबून राहणार ना? त्यानंतर मला दिवसाला कामाचे २ हजार मिळायला लागले. त्यामधून माझा टीडीएस जात होता.”
यावर मुनव्वर म्हणाला, “तू तर खूपच आनंदी झाली असशील ना?” यावर अंकिता म्हणाली, “हो मग. ५० हजार माझ्या अकाऊंटला येणार आहेत, या गोष्टीचा तू विचार कर ना. मी आयुष्यात ५० हजार कधीच पाहिले नव्हते.” त्यानंतर मुनव्वर म्हणतो, “मध्यवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी असेल आणि ती इंडस्ट्रीमध्ये येते. तर तिला घरच्यांच्या पाठिंबा खूप गरजेचा आहे.” यावर अंकिता म्हणाली,”हो घरच्यांचा सपोर्ट खूप गरजेचा असतो. त्यावेळी माझ्या आई-वडिलांच्या मागे लोकं खूप काही बोलायचे. पण माझ्या आई-वडिलांनी माझी साथ कधीच सोडली नाही आणि यामुळे मला ताकद मिळाली.”