Bigg Boss 17 Latest News : अंकिता लोखंडे जेव्हापासून बिग बॉस १७ मध्ये आली आहे, तेव्हापासून ती तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे व तिच्या भूतकाळामुळे चर्चेत आली आहे. अंकिताने पुन्हा एकदा तिचा माजी प्रियकर व दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण काढली आहे. अंकिताने तिची प्रतिस्पर्धी ईशाला सांगितले की, ती मुनव्वरची स्थिती समजू शकते. त्याने त्याच्या ब्रेकअपची बातमी का लपवली हे मी समजू शकते. हे जगजाहीर करणे इतके सोपे नाही.
अभिनेत्री म्हणाली की, तुमचं नातं अधिक घट्ट होईल अशी अशा आहे. सार्वजनिक क्षेत्रात नाव आल्यानंतर संबंध बिघडतात असंही ती म्हणाली. पुढे अभिनेत्रीने सांगितले की, “जेव्हा सुशांत व माझे ब्रेकअप झाले तेव्हा मी कोणालाही सांगितले नाही. कारण मला आशा होती की सर्व काही ठीक होईल”. ‘बिग बॉस’च्या घरात नवा ट्विस्ट आला आहे. अलीकडेच मुनवर फारुकीची जवळची मैत्रीण आयशा खानने या शोमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान तिने मुनव्वरवर डबल डेटिंगचा आरोप केला. मात्र यावर मुनव्वर यांनी स्पष्टीकरण देत आपण कोणाचीही फसवणूक केली नसल्याचे सांगितले आहे.
अंकिताने ईशाला सांगितले की, “अनेकवेळा एखादी व्यक्ती ब्रेकअपबद्दल सांगत नाही कारण त्याला वाटते की कदाचित नाते पुन्हा चांगले होईल. त्याबद्दल आपल्याला एक आशा असते. मला आठवतंय जेव्हा माझं ब्रेकअप झालं होतं, दोन वर्षं मला त्याबद्दल कुणालाही कळू नये असं वाटत होतं. जेव्हा मी विकीसोबत रिलेशनशिपमध्ये आले तेव्हा सगळ्यांनी मला ट्रोल केले. पण त्याने मला खूप साथ दिली. ब्रेकअपनंतर दोन वर्षे मी याबद्दल उघडपणे बोलले नाही”.
अंकिताचे म्हणणे ऐकून ईशा भावूक झाली. ईशा म्हणाली, “मी समजू शकते. जेव्हा मी अभिषेकला डेट केले तेव्हा याच कारणांमुळे मी एका मुलाखतीत आमचे नाते स्वीकारले नाही”. यावर उत्तर देताना अंकिता म्हणाली, “सुशांत परत येईल अशी मला अपेक्षा होती. कारण आमचे नाते सात वर्षांचे होते. मला आशा होती की तो घरी परतेल. या कारणास्तव मी कोणालाही सांगितले नाही. आम्ही ज्या घरात राहत होतो तिथे आमची छायाचित्रे होती” असं म्हणत अंकिता पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणीत रमली.