‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या कथानकाने व मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. आजही ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील खलनायिकेचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीवरही प्रेक्षक तितकंच प्रेम करताना दिसत आहेत. (Jahnavi Killekar New Two Wheeler)
‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतून खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री जान्हवी किल्लेकर असली तरी तिने तिच्या सहज सुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनात आपली जागा मिळवली आहे. अभिनयासह तिचे घारे डोळे चाहत्यांना भुरळ पाडल्यावाचून राहत नाहीत. जान्हवी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिचे चाहतेही सोशल मीडियावरून तिच्याशी नेहमीच संवाद साधताना पाहायला मिळतात”.
अशातच जान्हवीच्या नव्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने नवी कोरी गाडी घेतली असल्याची आनंदची बातमी तिच्या चाहत्यांसह शेअर केली आहे. जान्हवीने दुचाकी घेतल्याचे फोटोस तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. नव्या दुचाकीवर फोटोशूट करून काही फोटो शेअर करत तिने ही बातमी दिली आहे. जान्हवीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे.

जान्हवीच्या या नव्या दुचाकीच्या फोटोंवर एका युजरने केलेली कमेंट लक्ष वेधून घेत आहे. जान्हवीने इलेक्ट्रिकल दुचाकी घेतल्याने एका युजरने “पेट्रोल परवडत नाही वाटतं” अशी गमतीशीर कमेंट केली आहे. तर अनेकांनी तिच्या या पोस्टवर तिचं अभिनंदन करत तिच्या सौंदर्याचंही कौतुक करत कमेंट केल्या आहेत. जान्हवीने याआधी बऱ्याच छोट्या मोठ्या भूमिकांमधून काम केलं आहे. पण खऱ्या अर्थाने जान्हवीला ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतील सानिया या पात्रामुळे लोकप्रियता मिळाली आहे. ग्रे शेड असलेल्या या भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.