सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या अभिनयातून सगळ्यांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या हटके स्टाईलने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही स्वतःचा दबदबा निर्माण केला. रजनीकांत यांच्या चित्रपटांची बरीच चर्चा रंगताना दिसते. पण सध्या रजनीकांत वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांचा मोठा नातू व अभिनेता धनुष याचा मुलगा यात्रा राजा याच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे. त्याने वाहतुक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केली गेल्याचं समोर येत आहे. (Rajinikanth grandson yatras fine issued by traffic police)
धनुष व ऐश्वर्या रजनीकांत यांचा मुलगा यात्राला गाडी चालवताना वाहतुक पोलिसांकडून थांबवण्यात आलं. त्यावेळी तो चेन्नईच्या पोस गार्डन परिसरात सुपर बाईक चालवत होता. तर त्याला धनुषचा सहाय्यक स्कूटी चालवत मार्गदर्शन करत होता. त्यावेळी त्याला हेल्मेट न घातल्यामुळे वाहतूक पोलिसांनी थांबवलं आणि त्याची चौकशी करण्यात आली.
तपासादरम्यान त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नसल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर तो चालवत असलेल्या सुपर बाईकला नंबर प्लेटही नसल्याचं पोलिसांनी हेरलं. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला. नियमांच उलंघन केल्यामुळे त्याच्यावर १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पिंकविलाच्या वृत्तानुसार, पोलिसांनी यात्राच्या चौकशीत त्याच्या आईचं ऐश्वर्या रजनीकांतचं नाव समोर आल्यानंतर त्याची ओळख पटली.मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॉफिक पोलिसांनी नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी यात्राला ठोठावलेल्या दंडाबाबत मत स्पष्ट केलं की, ‘नियम प्रत्येकासाठी सारखेच असतात. मग ती व्यक्ती कोणत्याही कुटुंबातील असले तरीही नियम सगळ्यांसाठी सारखेच आहेत’. सध्या चेन्नई वाहतूक पोलिसांचं दंड आकारल्यामुळे सोशल मीडियावर बरंच कौतुक होत आहे.
धनुषने २००४मध्ये रजनीकांत यांच्या मोठ्या मुलीशी म्हणजेच ऐश्वर्या रजनीकांतबरोबर लग्न केलं. त्यांची दोघांची भेट ही एक चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झाली होती. त्यानंतर २००६ मध्ये यात्राचा जन्म झाला. ज्याचं आताचं वय हे १७ वर्षे आहे. तर दुसरा मुलगा लिंगा हा १३ वर्षाचा आहे. लग्नाच्या १८ वर्षांनंतर धनुष व ऐश्वर्या यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. विभक्त होऊनही ते दोघं त्यांच्या मुलांचं एकत्र संगोपन करत आहेत.