अभिनेता कुशल बद्रिके हा त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतोच. मात्र अभिनेता त्याच्या अभिनयाबरोबरच लिखाणानेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेला कुशलला त्याच्या विनोदाचं जबरदस्त टायमिंग, हटके विनोद शैली ही त्याला इतर कलाकारांपेक्षा नेहमीच वेगळं ठरवते. कुशल अभिनयासह सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो शेअर करत असतो. त्याचबरोबर त्याच्या फोटोखालचे कॅप्शनही अनेकदा लक्ष वेधून घेतात.
अशातच कुशलने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कुशलने “आयुष्य त्या ट्रेनच्या डब्ब्यासारखं झालं आहे, जिथे ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर उतरुन निघून जातात. सहप्रवासी बदलत राहतात, पण ‘प्रवास’ मात्र कायम असतो” अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती. त्याच्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला होता. अशातच या फोटोखालील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कुशल सध्या ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी विनोदी कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये कुशलने परीक्षक हेमा कुरेशीच्या पाया पडल्याचे पाहायला मिळाले. यावर एका चाहत्याने कुशलला “‘मॅडनेस मचाएंगे’च्या गेल्या भागात तू हुमा कुरेशीच्या पाया पडले. याचे कारण कळू शकेल का?, कारण तू त्यांच्यापेक्षा मोठा आहेस.” असा प्रश्न विचारला.
चाहत्याच्या या प्रश्नाचे उत्तर देत कुशलने असं म्हटलं की, “मित्रा तुमचा प्रश्न खरा वाटला म्हणून उत्तर देतो. त्यावेळी तिथे प्रश्न वयाचा नव्हता, भावनेचा होता. मला भरून आलं, तेव्हा त्यांना एक बहीण म्हणून मला मिठी मारावी वाटली हे त्यांच्या संस्कारातून आलं आहे आणि माझ्या भावनेची त्यांना कदर करावीशी वाटली म्हणून मी पाया पडलो हे आपल्या संस्कारातून आलं आहे”.