बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिससह प्रेक्षकांच्या मनात आपले घर निर्माण केले. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री नयनतारा यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. तर हा चित्रपट दिग्दर्शित करणारा तामिळ दिग्दर्शक ॲटलीचेही विशेष कौतुक झाले. अशातच या चित्रपटासाठी ॲटलीला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. यावेळी पुरस्कार स्वीकारायला जाताना त्यांनी केलेल्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
रविवारी रात्री मुंबईत झालेल्या ‘झी सिने अवॉर्ड्स २०२४’मध्ये ॲटलीला ‘जवान’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. या सोहळ्याची झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ॲटली खूपच उत्साहित दिसत असून त्याच्या चेहऱ्यावर पुरस्कार मिळाल्याचा आनंद स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी पुरस्कार घ्यायला जाताना ॲटली शाहरुख खानच्या पायाला स्पर्श करतो. यानंतर शाहरुख त्याला मिठी मारून त्याचे अभियनंदन करतो. ॲटली व शाहरुखच्या या व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओखाली अनेकांनी ॲटलीचे कौतुक केले आहे. “तू यासाठी खरोखरचं पात्र आहेस, याला म्हणतात दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे संस्कार, मोठ्यांच्या पायांना स्पर्श केला पाहिजे” अशा अनेक कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी शाहरुखच्या पाया पडण्याची काय गरज होती, तसेच या चित्रपटाला पुरस्कार कसा काय मिळाला?” असं म्हणत नकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – “याचा फोन फोडू का मी…”, फोटोग्राफरवर का भडकली सई ताम्हणकर?, व्हिडीओ होतोय व्हायरल
दरम्यान, या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसला होता. तसेच त्याच्यासह नयनतारा, दीपिका पादुकोण, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, लहार खान, गिरीजा ओक आणि संजीता भट्टाचार्य आदी कलाकारही होते. या चित्रपटाने जगभरात सुमारे ११६० कोटी रुपयांची कमाई केली होती.