मैत्रीचं उदाहरण देताना लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगांवकर यांच्याबद्दल नेहमीच बोललं जातं. पडद्यावर त्यांची ही मैत्री नेहमीच प्रेक्षकांना भावली. मात्र पडद्यामागे ही त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत जे आजवर कानावर आले आहेत. बरं पण अशोक सराफ यांच्या आयुष्यातील सच्चा मित्र नेमका कोण आहे, याबद्दल स्वतः अशोक सराफ यांनी ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमात भाष्य केलं. त्यांच्या मित्राची आठवण काढत त्यांनी त्या व्यक्तीच कौतुक केलं. अशोक सराफ यांचा खरा मित्र दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते सुधीर जोशी आहेत. चित्रपटसृष्टीतील विनोदाची स्किल हुबेहूब पेलवणारा अभिनेते म्हणजे सुधीर जोशी. (Ashok Saraf And Sudhir Joshi Friendship)
‘दोन स्पेशल’ कार्यक्रमात जेव्हा अशोक सराफ यांना सुधीर जोशी यांचा फोटो दाखवण्यात आला. तेव्हा त्यांनी सुधीर जोशी यांच्याबरोबरच्या मैत्रीबद्दल सांगितलं, अशोक सराफ म्हणाले, “माझ्या आयुष्यात भेटलेला सगळ्यात सच्चा, खरा मित्र. मराठी सिनेसृष्टीत त्याच्यासारखा कमालीचा अभिनेता मी फार अभावीने पाहिला आहे. उत्तम विनोदीशैली त्याच्याजवळ होती. कोणत्या वेळेला काय बोलेल यांचा थांगपत्ता लागण कठीणंच. आणि मला कोणच्याही विनोदावर तसं फार कमी हसायला येत.”
“फार कमी जण अशी असतील ज्यांच्या विनोदावर मला हसू येत, त्यापैकी एक नाव म्हणजे सुधीर जोशी. अगदी खळखळवून हसवणारा अभिनेता म्हणजे सुधीर जोशी. जास्तीत जास्त वेळ मी याच्यासोबत शेअर केला. माझ्या आयुष्यात मी स्वतःहून फोन करून गप्पा मारेन असा एकमेव मित्र म्हणजे सुधीर जोशी. अगदी आम्ही तासनतास बोलायचो. मी नेहमीच त्याला जाड्या बोलायचो. मी जाडा असूनही मी त्याला जाड्या बोलायचो. पण जेव्हा सुधीर आपल्या सर्वांना सोडून गेला तेव्हा कुठेतरी माझ्याबरोबर असणारी विनोदाची साथ लंगडी झाली. कारण या माणसाची श्रेष्ठता अशी आहे की, विनोदी नटाला काय करावं ते कळतं, पण मी हे करणार नाही, हे करायचं नाही हे सांगणारा हा नट आहे.”
“‘बनवाबनवी’ मधील आमचे सीन अगदी पाठ झाले आहेत. पहिल्यांदा या सिनेमात सुधीरने काम केलं होत. त्याआधी त्याने कधीही सिनेमात काम केलं नव्हतं. पण काम असं केलं की कोणालाही पाहून वाटेल की, जवळजवळ शंभर सिनेमे याआधी त्याने केले असावेत. आणि हीच खासियत सगळ्यात महत्वाची आहे. स्टेजवर जेव्हा त्याने काम करायला सुरुवात केली तेव्हापासून मी त्याला जवळून पाहील आहे. आणि मला असे नट फार आवडतात जे शून्यातून काहीतरी निर्माण करतात. शून्यातून मी कोण आहे हे तयार करणाऱ्यांपैकी हा एक नट होता. सुधीर माझा अत्यंत लाडका मित्र आहे, आणि त्याला मी विसरू शकतच नाही. माझा व निवेदिताचा असा एकही दिवस जात नाही की, मला याची आठवण आली नसावी. हा कायम माझ्या मनात राहील”.