गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. देशभरात या उत्सवाचा वेगळा आनंद पाहायला मिळत आहे. कलाकार मंडळीही यात मागे राहिली नसून मराठीसह अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घरी बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले आहे. मराठीसह हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरण पूरक अश्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. मात्र, यंदा त्याने बनवलेला बाप्पा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Riteish Deshmukh make Eco-Friendly Ganesha)
अभिनेता रितेश देशमुख आपल्या कुटुंबासह दरवर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करत असतो. दरवर्षी स्वतःच्या हातांनी बाप्पाची मूर्ती घडवताना पर्यावरणाची हानी पोहोचवत नसल्याची काळजी तो पुरेपूर घेत असतो. दरवर्षी रितेश मातीची मूर्ती बनवत असून त्याच्या बाप्पाचा आरासही पर्यावरण पूरक असते. मात्र, यंदा अभिनेत्याने आगळीवेगळी गणेशमूर्ती बनवली असून रितेशच्या घरातील यंदाचा बाप्पा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
रितेश देशमुखने यंदा खास टाकाऊ वस्तूंचा वापर करत पर्यावरण पूरक बाप्पा बनवला आहे. यासाठी त्याने खास गाड्यांचा पार्ट व लोखंडाच्या टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे. विशेष म्हणजे, त्याच्या या कामात त्याची पत्नी जिनिलिया देशमुख आणि मुलं रिहान व राहिल यांचीदेखील साथ मिळाली आहे. रितेशने हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहते त्याचं कौतुक करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – पार्टी, एकांत, आठवणी अन्…; असं होतं सई ताम्हणकरचं जुनं घर, नव्या घरात शिफ्ट होताना रडू लागली अभिनेत्री, म्हणाली, “ज्या घरामध्ये…”
रितेशच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ पोस्ट करताना अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, रितेश पत्नी व मुलांसोबत गणरायाची मूर्ती तयार करताना दिसत आहे. दरम्यान, गणरायाची मूर्ती घडवताना रितेशची मुलं त्यांच्या आवाजात गणपतीची आरती म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंटद्वारे प्रतिक्रिया देत अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हे देखील वाचा – “कठोर निर्णय, वाद…”, ‘झी मराठी’मध्ये जॉब करत होता अद्वैत दादरकर, राजीनामा दिल्यानंतर म्हणाला, “जास्त अपयशच आलं आणि…”
अभिनेता रितेश देशमुख आपल्याला ‘वेड’ चित्रपटात दिसला होता. ज्यामध्ये त्याने जिनिलिया देशमुखसह स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. देशमुख कुटुंब सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ते नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटोज व व्हिडिओज शेअर करत असतात.