Anupam Kher Upset On National Award : ६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांची संपूर्ण जगभरात चर्चा होत आहे. दरम्यान या राष्ट्रीय पुरस्काराच्या विजेत्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. तर विजेते झाल्यामुळे सर्वच विजेते पोस्ट शेअर करून आभार व आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला. दरम्यान द काश्मीर फाईल्सच्या विवेक अग्निहोत्री यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र चित्रपटाचे मुख्य अभिनेते अनुपम खेर यांना अभिनयासाठी पुरस्कार न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अनुपम खेर यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी लिहिले आहे की, “‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे ही अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या चित्रपटाला नॅशनल इंटिग्रेशनवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला केवळ एक अभिनेता म्हणूनच नाही तर चित्रपटाचा कार्यकारी निर्माता म्हणूनही मिळालेली ओळख पाहून मी आनंदी आहे. मला माझ्या अभिनयासाठीही पुरस्कार मिळाला असता तर अधिक आनंद झाला असता. पण सर्व इच्छा पूर्ण झाल्या तर पुढे काम करण्याची मजा आणि उत्साह कसा असेल. जाऊ द्या! पुढच्या वेळेस.’
NATIONAL AWARD: Delighted and proud that #TheKashmirFiles won the prestigious and most important #NationalAward – Nargis Dutt award for #BestFeatureFilm on national integration. Not only as an actor but also being an executive producer on the film I am so happy for this… pic.twitter.com/Sdka6EOJoV
— Anupam Kher (@AnupamPKher) August 24, 2023
काश्मिरी पंडितांच्या पलायनाची आणि ९० च्या दशकातील त्यांच्या वेदनांची कथा सांगणारा ‘काश्मीर फाइल्स’ मार्च २०२२ मध्ये रिलीज झाला. बऱ्याच स्तरातून या चित्रपटाला खूप प्रशंसा मिळाली, तर काही लोकांनी याला ‘प्रोपगंडा फिल्म’ असेही म्हटले. या चित्रपटात अनुपम खेर व्यतिरिक्त पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर, मिथुन चक्रवर्तीसारखे कलाकार होते.
तर विवेक अग्निहोत्री यांनी एक व्हिडिओ शेअर करत पुरस्कार मिळाला असल्याचा आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “‘मी अमेरिकेत आहे. पहाटे फोन वाजला तेव्हा ‘द काश्मीर फाइल्स’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची बातमी मिळाली. ‘द कश्मीर फाइल्स’ हा केवळ माझा चित्रपट नसून मी फक्त एक माध्यम आहे, हे मी नेहमीच सांगितले आहे. काश्मीरमधील सर्व दहशतवादी घटनांचे बळी, काश्मिरी हिंदू, शीख, ख्रिश्चन, मुस्लिम, दलित, गुज्जर हा चित्रपट त्यांचा आवाज आहे. त्यांच्या वेदनेचा आवाज आहे. जो संपूर्ण जगापर्यंत पोहोचला आहे. रात्रंदिवस मेहनत करून आम्ही ते जगभर नेले. आणि आज राष्ट्रीय पुरस्कारामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मी हा पुरस्कार दहशतवादाला बळी पडलेल्या सर्वांना समर्पित करतो”.