Kangana Ranaut On 69th National Award : ६९व्या राष्ट्रीय पुरस्काराच्या विजेतेपदाची नुकतीच घोषणा झाली आहे. २४ ऑगस्ट रोजी या राष्ट्रीय पुरस्काराच्या विजेतेपदावर कोणी कोणी नाव कोरलं याची घोषणा करण्यात आली. दरम्यान विजेत्यांचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत सगळेचजण आपली प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रीय पुरस्काराच्या विजेतेपदाची नाव जाहीर होताच अभिनेत्री कंगना रनौत हिने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमधून अभिनेत्रीने साऱ्यांच कौतुक, अभिनंदन जरी केलं असलं तरी ती नाराज असल्याचं समजतंय.
कंगना रनौत हिने ६९व्या राष्ट्रीय पुरस्काराचा निकाल जाहीर होताच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून तिने विजेत्यांचं अभिनंदन केलं असून, तिच्या मनातली गोष्टदेखील शेअर केली आहे. कंगनाने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “६९व्या राष्ट्रीय पुरस्काराच्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन, हा एक असा आर्ट कार्निव्हल आहे जो देशभरातील सर्व कलाकारांना एकत्र आणतो. सर्व भाषांमध्ये होत असणाऱ्या इतक्या महत्त्वाच्या कामाची ओळख करून देणे खरोखरच जादुई आहे”.
“माझा ‘थलायवी’ हा चित्रपट जिंकू शकला नाही याबद्दल निराश झालेल्या तुम्हा सर्वांनी कृपया जाणून घ्या की, कृष्णाने मला जे काही नाही दिले त्याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे. माझ्यावर खरोखर प्रेम करणाऱ्या, कौतुक करणाऱ्या तुम्ही सर्वांनी माझ्या दृष्टीकोनाची प्रशंसा केली पाहिजे. मी कला व्यक्तिनिष्ठ आहे आणि मला विश्वास आहे की ज्युरींनी त्यांचे सर्वोत्तम कार्य केले. मी सर्वांना शुभेच्छा देते. हरे कृष्णा”
आलिया भट्ट व क्रिती सॅनन यांना या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर कंगना रणौतचे चाहते यावेळी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार न मिळाल्याने निराशा व्यक्त करत आहेत. तर अनेकांनी ‘ गंगूबाई काठियावाडी’तील आलियाच्या विजयाबद्दल तिची जोरदार खिल्ली उडवत आहेत. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्काराध्ये हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांसह मराठी चित्रपटांनीही आपला झेंडा रोवला आहे. ‘एकदा काय झालं’, ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. तर हिंदीमध्ये ‘गंगुबाई’, ‘सरदार उधम’ चित्रपटाने चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.