अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करुन आशयघन विषय प्रेक्षकांसमोर मांडत बॉक्स ऑफिसवर बक्कळ कामे करणारा अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे प्रसाद ओक. ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसादने सांभाळत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. याशिवाय अनेक चित्रपटांमध्येही प्रसादने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या प्रसाद आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित ‘धर्मवीर २’ मध्ये भूमिका साकारत आहे. (Prasad Oak And Amruta Khanvilkar)
काही दिवसांपूर्वीच प्रसाद ओकचा वाढदिवस झाला. प्रसादच्या वाढदिवसानिमित्त सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर प्रसाद बऱ्यापैकी सक्रिय असतो. चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी प्रसाद व त्याची पत्नी मंजिरी नेहमीच मजेशीर व्हिडीओ बनवून चाहत्यांसह शेअर करत असतात. प्रसाद व मंजिरीने एकमेकांना साथ देत सिनेसृष्टीतील त्यांचं स्थान निर्माण केलं आहे.
प्रसादच्या वाढदिवसानिमित्त त्याची सहकलाकार अमृता खानविलकरने त्याला खास शुभेच्छा देत पोस्ट शेअर केली होती. प्रसाद व अमृताने मिळून बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी चित्रपटातील अमृता खानविलकरच्या चंद्रा या भूमिकेने अभिनेत्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. याशिवाय लवकरच प्रसाद व अमृता त्यांच्या आगामी पठ्ठे बापूराव या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. प्रसाद व अमृता यांचं सेटवर वा चित्रीकरणादरम्यान काम करताना एक उत्तम बॉण्डिंग असलेलं पाहायला मिळालं आहे, तसेच त्यांचं खासगी आयुष्यातही मैत्रीपूर्ण नातं असल्याचं पाहायला मिळतं.
प्रसादच्या वाढदिवसानिमित्त अमृताने अभिनेत्याला खास गिफ्ट दिलेलं पाहायला मिळत आहे. प्रसादने अमृताने दिलेल्या या खास भेटवस्तूचा फोटो शेअर केला आहे. अमृताने प्रसादसाठी वाढदिवसानिमित्त खास घड्याळ भेटवस्तू म्हणून दिलं आहे. हा फोटो शेअर करत प्रसादने अमृताला टॅग केलं असून हार्ट इमोजी शेअर केले आहेत. प्रसादसाठी अमृताने दिलेली ही भेटवस्तू खास असल्याचं त्याच्या पोस्टवरुन कळत आहे.