‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पाचव्या पर्वामधून ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर घराघरांत पोहोचली. सोशल मीडियावर ती रील स्टार म्हणून लोकप्रिय होतीच, पण ‘बिग बॉस मराठी’मुळे तिच्या या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ पासून अंकिता कायमच चर्चेत आहे. ‘बिग बॉस’ संपल्यानंतर अंकिता तिच्या वैयक्तिक आयुष्यात रमलेली पाहायला मिळत आहे. कायम नाती जपणारी अशी तिची चाहत्यांमध्ये ओळख निर्माण झाली आहे. ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर अंकिता सोशल मीडियावर पुन्हा एकदा नव्याने सक्रीय झाली आहे. सध्या टी तिच्या लग्नाच्या गडबडीत व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
अंकिता वालावलकर सोशल मीडियाद्वारे आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अंकिता वालावलकर नुकतीच होणारा नवरा कुणाल भगत बरोबर अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेली होती. यावेळी तिला व्हील चेअरवर बसलेल्या महिलेची भेट घेतली. अंकिताला बघून ती महिला भारावून गेली असून तिचं कौतुक करताना दिसत आहे. त्यांची भेट घेतल्यानंतर अंकिता त्या महिलेच्या पाया पडते. तसंच अंकिता त्या महिलेबरोबर फोटोही काढते.
अंकिता वालावलकर होणारा नवरा कुणाल भगत बरोबर लग्नाची पत्रिका घेऊन अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेली होती. यावेळी तिने स्वामी समर्थांच्या चरणी तिची लग्नपत्रिका ठेवली. तसंच अंकिताने यावेळी अन्नदानदेखील केले आणि याचे काही खास क्षण तिने शेअर केले आहेत. याबद्दलची एक पोस्टही तिने शेअर केली आहे, ज्यात असं म्हटलं आहे की, “काल स्वामींच दर्शन घेऊन आलो.. मनात खूप गोष्टी होत्या..सतत वाटायचं की खोटं वागणाऱ्यांसोबत चांगलं का होतं? आपण खरं वागून चुकीचे का वाटतो? आपल्याला मुद्दाम चुकीच का दाखवलं गेलं? पण अक्कलकोट हे एक अस स्थान आहे जिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात”.
दरम्यान, अंकिता-कुणाल यांची लग्नपत्रिका ही केळीच्या पानाच्या डिझाइनची आहे. यावर कुणाल आणि अंकिता अशी नावे लिहिली आहेत. अंकिताने परंपरेनुसार सर्वप्रथम गावच्या मंदिरात आपल्या लग्नाची पत्रिका ठेवली होती. तिने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. पण अंकिता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात लग्नबेडीत अडकणार असल्याचे म्हटलं जात आहे.