‘बिग बॉस १७’ मध्ये अंकिता लोखंडे हिने तिचा पती विकी जैन बरोबर प्रवेश केला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात येण्याआधीपासूनच हे कपल चर्चेत असायचं. सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत ते नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतात. मात्र ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर तर हे कपल मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे. त्यांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांनी असा अंदाज बांधला होता की, ही जोडी ‘बिग बॉस’च्या घरात अधिक काळ वास्तव्य करेल. पण तसं चित्र दिसत नाही आहे. (Ankita Lokhande And Vicky Jain)
‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यापासूनचं या पती-पत्नीमध्ये दररोज भांडणे होत आहेत. अंकिताच्या म्हणण्यानुसार तिला विकीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवता यावी म्हणून ती ‘बिग बॉस’च्या घरात आली होती. अंकिताने असंही सांगितले की, विकी आणि ती एकत्र राहत नाहीत. अंकिताने ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्याचा खुलासा केला. ‘बिग बॉस १७’ मध्ये जाण्यापूर्वी तिने ही मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने सांगितले की, “ती आणि विकी एकमेकांची कंपनी एन्जॉय करतात. ‘बिग बॉस’च्या घरातही सर्वांना हेच पाहायला मिळणार आहे.” मात्र तसं होताना दिसत नाही. अंकिता व विकी यांच्यात सततची भांडण पाहायला मिळत आहेत. विकी अंकिताला पुरेसा वेळ देत नसल्याची तक्रार ही तिने केली आहे. मात्र विकी या तिच्या तक्रारीला सहमत नाही आहे.
अंकिताने मुलाखतीदरम्यान सांगितले की, “‘बिग बॉस’मध्ये जाण्याचे कोणतेही विशेष असे कारण नाही. मला ‘बिग बॉस’मध्ये जायचे होते आणि वाटले की या वर्षी जावे. विकी तिचा सपोर्ट सिस्टीम आहे. यापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही, असंही अभिनेत्रीने सांगितले. आम्ही एकमेकांच्या कंपनीचा आनंद घेतो आणि एकत्र अधिक वेळ घालवण्यासाठी ‘बिग बॉस १७’ मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असंही ती म्हणाली.
अंकिता पुढे म्हणाली, “मी या शोचा चार महिन्यांचा प्रवास म्हणून इथे आले आहे, जिथे आम्हा दोघांना एकत्र राहण्याचा आनंद घेता येईल. आम्ही एकत्र राहत नाही. मी मुंबईत राहते आणि विकी बिलासपूरला राहतो. कारण त्याचा तिथे व्यवसाय आहे. तो मुंबईत येऊन जाऊन असतो, पण हनिमूनच्या दिवस सोडता, आम्हाला २० दिवसांपेक्षा जास्त वेळ एकत्र राहायला मिळत नाही. आमच्यासाठी ही फक्त एक चांगली संधी आहे.”