‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. मालिकेत एकामागोमाग एक आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका सध्या लोकप्रियेतच्या शिखरावर आहे. सायली व अर्जुनला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. सध्या मालिकेत सायलीने आनंदाची बातमी दिलेली पाहायला मिळतेय. यांत सायली गरोदर असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सुभेदार कुटुंबात सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. मात्र सायली व अर्जुनच्या चेहऱ्यावरील रंगचं उडालेले आहेत. (Tharal Tar Mag New Promo)
मालिकेच्या मागील भागात पाहायला मिळालं की, कल्पना डॉक्टरांना फोन करून सायलीच्या रिपोर्टबद्दल विचारते, तेव्हा डॉक्टर सायली प्रेग्नेंट असल्याचं सांगतात. हे ऐकून कल्पनाचा आनंद गगनात मावेनासा होतो. आणि ती ही गोड बातमी घरच्यांना देते. तेव्हा मात्र सायली व अर्जुन यांना धक्काच बसतो. त्यानंतर कल्पना सायलीची विशेष काळजी घेताना दिसते. कल्पनाला तिच्या सुनेच्या गरोदरपणात कोणतीही जोखीम पत्करायची नसते म्हणून ती सायलीची विशेष काळजी घेताना दिसते.
तर एकीकडे सायली ‘ती गरोदर नाही आहे’ हे कसं सांगायचं याचा विचार करत असते. सायलीला आपण खोटं बोलतोय म्हणून अपराधी वाटत असतं. ती देवीसमोर उभी राहून प्रार्थना करते. तेवढ्यात तिला आठवतं की दूध गॅसवरच राहिलं आणि म्हणून ती किचनमध्ये धावत जाते. नेमकं हे कल्पना पाहते आणि ती तिच्यावर प्रचंड चिडते. पहिल्या तीन महिन्यात खूप काळजी घ्यावी लागते, असं ती तिला सांगते. तसेच धावपळ न करण्याची तंबीच ती सायलीला देते. हा सगळा प्रकार अस्मिता बघत असते आणि तिने रचलेल्या कटाचा आनंद घेते.
त्यानंतर येणाऱ्या भागात, कल्पना सायली-अर्जुनला सरप्राईज देणार आहे. सुभेदार कुटुंबीय मिळून दोघांसाठी छोट्याशा पार्टीचं आयोजन करणार आहेत असं विशेष भागाच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. या पार्टीत कल्पनासह घरातील सगळे सायली गरोदर असल्याचा आनंद साजरा करत असतात. यावेळी सायलीला आपण सर्वांची फसवणूक करत आहोत याची जाणीव होते आणि ती मोठ्याने ओरडून ‘मी गरोदर नाही आहे’, असं सर्वांना सांगते.