‘शक्ति: अस्तित्व के एहसास की’, ‘यारों का टशन’ आणि ‘पटियाला बेब्स’ यासारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे अनिरूद्ध दवे. नुकतंच त्याने अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’सह अनेक चित्रपटामध्येही काम केले आहे. अभिनेता दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये वेब शोसाठी शूटिंग करत होता. त्यानंतर २३ एप्रिल २०२१ मध्ये त्याला कोरोनाची लागण झाली होती आणि जवळपास ५७ दिवस ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. याबद्दल त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केले आहे.
अनिरुद्ध दवेने ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचे आयुष्य अधिकच बिकट झाले होते. भोपाळमध्ये शूटिंगदरम्यान त्याला कोरोना झाला होता. तेव्हा परिस्थिती इतकी बिकट होती की, त्याने जगण्याची आशाच सोडून दिली होती. यावेळी त्याची अवस्था एका लहान मुलासारखी झाली होती.
याबद्दल त्याने असं म्हटलं की, “मी रूग्णालयात असताना दररोज कोणालातरी शेवटचा श्वास घेत असताना आणि मरताना पाहत होतो. याचा माझ्यावर खूप गंभीर परिणाम होत होता. अशा परिस्थितीत मी स्वतःला शांत ठेवण्यासाठी पोटावर झोपण्याचा प्रयत्न करत असे. कुठलाही क्षण माझा शेवटचा क्षण असू शकतो हे सतत माझ्या मनात यायचं. माझं आयुष्य हे एका लहान मुलासारखं झालं होतं. माझ्या हातात सगळीकडे इंजेक्शन्स होती आणि त्यामुळे मला डायपर घालावे लागायचे. पण तेव्हा मी काहीच करु शकत नव्हतो”.
हे सर्व सांगताना अनिरुद्ध दवेला अश्रु अनावर झाले. यानंतर त्याने असं म्हटलं की, “हे माझे दुसरे आयुष्य आहे. त्यासाठी मी देवाचे आभार मानतो. तेव्हा माझ्यावरील उपचारासाठी माझ्या कुटुंबीयांना मोठे कर्ज काढावे लागले होते. पण त्या काळात इंडस्ट्रीतील काही लोकांनी मला मदत केली आणि त्या लोकांचा मी आभारी आहे.”
दरम्यान, त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर अनिरुद्ध दवेने २००८ साली ‘राजकुमार आर्यन’ या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अशातच आता लवकरच तो ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.