Shreyas Talpade Health Update : अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला असून तो सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहे. ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटाचं शूटिंग संपवून तो घरी आला असताना ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. शूटिंगनंतर घरी येताच त्याला अस्वस्थ वाटत असल्याचं त्याने पत्नीला सांगितलं. त्यानंतर त्याला लगेचच अंधेरीमधील बेलव्हू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आल्यामुळे श्रेयसवरील मोठा धोका टळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयातील तपासणीदरम्यान अभिनेत्याच्या हृदयामध्ये ब्लॉक असल्याचं आढळलं. त्यानंतर रात्री १० वाजताच्या सुमारास श्रेयसची अँजिओप्लास्टी करण्यात आली. दरम्यान त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. याबाबत रुग्णालयातील अधिकाऱ्याकडून माहिती समोर आली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, वैद्यकीय सुविधेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “अभिनेत्याची गुरुवारी अँजिओप्लास्टी करण्यात आली”.
श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत अपडेट शेअर करताना एका अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ला सांगितले, “गुरुवारी (१४ डिसेंबर) संध्याकाळी उशिरा त्यांना रुग्णालयात आणण्यात आले आणि रात्री त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची तब्येत ठीक आहे. सध्या ते आयसीयूमध्ये आहेत”. दरम्यान, अभिनेत्याच्या पत्नीनेही सोशल मीडिया अकाऊंटवरुन पतीच्या तब्येतीबाबत सांगितलं.
पतीच्या तब्येतीबाबत दीप्ती म्हणाली, “माझ्या पतीची तब्येत बिघडल्यानंतर तुम्ही दाखवलेली काळजी, प्रेम आणि प्रार्थना याबाबत मी तुमची आभारी आहे. आता मी तुम्हाला सांगू इच्छिते की, आता त्याची तब्येत स्थिर आहे. काही दिवसांमध्येच त्याला रुग्णालयामधून घरी आणण्यात येईल. या संपूर्ण काळामध्ये वैद्यकिय यंत्रणांनी दिलेला प्रतिसाद तसेच त्यांची घेतलेली काळजी महत्त्वपूर्ण ठरली. तुम्ही आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हा दोघांना संकटाशी सामना करायचं बळ मिळत आहे” असं म्हणत तिने चाहत्यांचे आभार मानले.