सध्या सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का देत आहेत. तर काहींनी थेट लग्नबंधनात अडकत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश परब, तितीक्षा तावडे, सिद्धार्थ बोडके, पूजा सावंत या कलाकारांच्या लग्नसोहळ्याचे फोटो समोर आले. सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच आता आणखी एका लोकप्रिय व मराठमोळी जोडी लग्नबंधनात अडकली आहे. सोशल मीडियावरुन थेट लग्नाचे फोटो शेअर करत दोघांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. ही जोडी म्हणजे जीव माझा गुंतला फेम अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौघुले. (Saorabh Choughule and yogita chavan wedding)
छोट्या पडद्यावरील नायक-नायिकेची जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र असावी असं चाहत्यांना नेहमीच वाटत असतं. मालिकांमुळे बऱ्याच जोड्या खऱ्या आयुष्यात एकत्र आल्या आहेत. तर अशातच मालिकेमध्ये एकत्र पाहायला मिळालेली आणखी एक जोडी लग्नबंधनात अडकली आहे. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली जोडी म्हणजे अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौघुले. या मालिकेमुळे मल्हार व अंतरा या जोडीला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. अखेर आता आता ही जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे.
दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन थेट लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत. हमसफर असं म्हणत ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. पारंपरिक अंदाजात या जोडीचा विवाहसोहळा संपन्न झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. योगिता व सौरभ यांचा लग्नातील लूक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. योगिताने लग्नासाठी खास मरून रंगाची साडी नेसली आहे तर त्यावर हिरव्या रंगाचा डिझाइनर ब्लाउज परिधान केला आहे. शिवाय त्यावर घातलेल्या पारंपरिक दागिन्यांनी अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. तर सौरभ यावेळी पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये खूप उठून दिसत आहे. सौरभने घातलेल्या हिरव्या फेट्याने नववर आणखीनच सुंदर दिसत आहे.
२०२१ ला ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि मालिकेच्या सेटवर योगिता व सौरभची मैत्री झाली. त्यानंतर आता या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालेले पाहायला मिळतं आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल या आधी कधीच चर्चा केली नव्हती पण आता या त्यांच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांनाही आनंद झाला आहे. काही महिन्यांपूर्वी ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या जोडीची गाठ आयुष्यभरासाठी बांधली गेली आहे.