अनंत अंबानी व राधिका मर्चंट अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. अनंतचच्या लग्नाचे सर्व विधी संपले असून त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अंबानी कुटुंबाने लग्नाचा प्रत्येक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला. अगदी राजेशाही थाटामाटात हे लग्न पार पडलं. परदेशी पाहुणे तसेच बॉलिवूड कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावत चारचाँद लावले. यावेळी सून राधिकाची पाठवणी करताना पाहून सासरे मुकेश अंबानींच्या डोळ्यात पाणी आले. याचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो राधिकाच्या निरोपाच्या वेळी भावूक होताना दिसत आहे. (Anant Ambani-Radhika Merchant Wedding)
राधिका मर्चंटच्या निरोपाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पती अनंतबरोबर हळू हळू चालत पुढे येत आहे. यावेळी त्यांच्या बाजूला मुकेश अंबानी उभे आहेत. त्यानंतर पंडितजी राधिकाला चांदीचा दिवा देतात आणि राधिका त्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. यावेळी मुकेश अंबानींना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले दिसले. मुकेश अंबानींना रडताना पाहून उपस्थितही भावुक झाले.
सदर व्हिडीओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. आणि या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “कुटुंबातील सर्वात सत्यवान व्यक्ती”. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “मला या कारणासाठी मुकेश अंबानी आवडतात. ते आपल्या भावना व्यक्त करतात. तसेच त्या आपल्या सूनांशी अगदी प्रेमाने आणि आदराने वागतात, अगदी खऱ्या वडिलांप्रमाणे. त्यामुळेच ते निरोपाच्या वेळी भावूक झाले”. तर एकाने लिहिले आहे की, “मुकेश अंबानी खूप चांगले व्यक्ती आहेत आणि नीता अंबानी भाग्यवान आहेत की मुकेश अंबानी त्यांचे पती आहेत”.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे कार्यक्रम १२ जुलै ते १४ जुलै दरम्यान पार पडले. या सोहळ्यात देश-विदेशातील अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही लग्नात हजेरी लावत या लग्नसोहळ्याची शोभा वाढविली.