सध्या मनोरंजन विश्वामध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. सेलिब्रिटी मंडळींचा विवाहसोहळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अशामध्येच आता आणखी एका लग्नाची चर्चा सुरु आहे. मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चंटसह लग्नबंधनात अडकणार आहे. गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स ग्रीन्स येथे १ ते ३ मार्चमध्ये विवाहपूर्वीचे विधी पार पडणार आहेत. २०२३मध्ये अनंत व राधिकाचा शाही साखरपुडा पार पडला. यादरम्यान आता लग्नापूर्वीच्या तयारीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या विवाहसोहळ्यासाठी भारतातील अनेक दिग्गजांची हजेरी लागणार असून भारतातील हा शाही विवाहसोहळा असणार आहे. (Anant and radhika pre-wedding ceremony)
नुकतेच अंबानी यांच्या फॅनपेजवरुन अनंत व राधिकाच्या लग्नापूर्वीच्या तयारीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये जामनगर येथील निवासस्थानावर केलेली फटाक्यांची अतिषबाजी दिसत आहे. तसेच इतर शेअर केल्या गेलेल्या फोटोमध्ये राधिका, तिचे वडील वीरेन मर्चंट व तिची मैत्रिण दिसत आहे. सदर फोटोंमध्ये सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद असून वीरेन यांनी काळया रंगाचा गळाबंद कोट परिधान केला होता.

मार्चमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना खास भेट देण्यात येणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी महाबळेश्वरमधील दिव्यांग कारागीर खास भेट तयार करत आहेत. ‘स्वदेश’ हे भारतातील पारंपारिक कला आणि कारागिरांसाठी काम करत असून दृष्टीहीन कारागिरांकडून मेणबत्त्या तयार केल्या जात आहेत. ही संस्था आपल्या देशातील प्राचीन कला आणि हस्तकलेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी फक्त प्रयत्नच नाही तर नेतृत्वही करत आहेत. मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेश वस्त्रकलेमध्ये योगदान देणाऱ्या प्रतिभावान कलाकारांना ही संस्था प्रोत्साहन देते.

अनंत आणि राधिकाचा १९ जानेवारी २०२३ ला गोल धना समारंभामध्ये साखरपुडा संपन्न झाला. काही दिवसांपूर्वी लग्नपत्रिकेची झलकही पाहायला मिळाली होती. या पत्रिकेसह मुकेश आणि निता अंबानी यांनी स्वतः लिहिलेला मजकूरदेखील व्हायरल झाला. अनंत व राधिकाची जामनगरमध्ये लग्नगाठ बांधली जाणार असून लग्नाचे सर्व विधी हे १०,११ व १२ जुलै रोजी पार पडणार असून एप्रिल २०२४ मध्ये लग्नसमारंभ पार पडणार आहे. अजूनही अनंत आणि राधिकाच्या लग्नाची तारीख अंबानी कुटुंबाकडून निश्चित केलेली नाही.