अभिनेत्री नीना गुप्ता व फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता या बॉलिवूडमधील प्रसिद्ध मायलेकींची जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण सर्वात जास्त चर्चेत राहते, ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे. नुकतीच अभिनेत्री ट्विंकल खन्नाच्या ‘ट्वीक इंडिया’ शोमध्ये मसाबाने हजेरी लावली होती. ज्यात तिने तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तसेच, तिच्या पहिल्या घटस्फोटासाठी आई नीना गुप्ता स्वतःला दोषी मानत असल्याचा खुलासा तिने केला आहे. (Masaba Gupta)
अभिनेत्री नीना गुप्ता यांचं वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सशी अफेअर होतं. त्यावेळी त्यांनी लग्न न करताच मसाबाला जन्म दिला होता. पुढे नीना यांनी सिंगल मदर म्हणून मसाबाला मोठं केलं. आज मसाबा ही फॅशन डिझायनर व अभिनेत्री असून तिने वर्षाच्या सुरुवातीला अभिनेता सत्यदीप मिश्राशी दुसरं लग्न केलं आहे. तिचं पहिलं लग्न निर्माता मधू मंटेनाशी झालं होतं. मात्र, अवघ्या चार वर्षातच या दोघांचा घटस्फोट झाला होता. या घटस्फोटाला आपण जबाबदार असल्याचं नीनाला वाटायचं, असं मसाबा बोलली.
ती म्हणाली, “माझ्या आईला वाटत होतं की, मी लवकरात लवकर लग्न करावं. जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा तिला मोठा धक्का बसला होता. आम्ही वेगळे होत आहे, यावर तिला विश्वासच बसत नव्हता. ती म्हणायची, अरे तुम्ही आताच लग्न केलंय आणि लगेच वेगळं होताय, फक्त २ वर्ष झाली आहेत. तुम्ही लोकांनी एकत्र जास्त वेळ घालवला नाही.”
हे देखील वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याने चाळीमध्ये जाऊन फोडली हंडी, म्हणाला, “चाळीतल्या मित्रांनी…”
ती पुढे म्हणाली, “लग्नापूर्वी मला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचं होतं. पण आईचा याला कडाडून विरोध होता. तिला आमच्या नात्याबद्दल कळल्यावर तिने लगेचच माझं सामान पॅक केलं आणि मला घर सोडण्यास सांगितलं. दुसऱ्याच दिवशी तिने मला कोर्ट मॅरेज करायला लावलं. लग्नाशिवाय कोणीही कधीही सोडून जाऊ शकतं, असं तिला वाटायचं. तिने जी चूक केली तीच चूक मी करू नये, असं तिला वाटत होतं. त्यामुळे तिला लवकरात लवकर माझं लग्न करायचं होतं.”
हे देखील वाचा – एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेता आर. माधवनची नियुक्ती, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटद्वारे केली घोषणा
तिने पुढे हेदेखील सांगितलं की, जेव्हा तिचा घटस्फोट झाला तेव्हा आई नीनाला खूप वाईट वाटलं असून हे सर्व माझ्या चुकीमुळे घडल्याचं ती मला सांगायची. मी एक वाईट आई असून मी तुला लग्नापूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची परवानगी द्यायला हवी होती, असं नीना मला सांगत असल्याची मसाबा म्हणाली.