अभिनेता अक्षय कुमार हा बॉलिवूडमध्ये सतत चर्चेत राहणारे एक नाव आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयचा ‘मिशन राणीगंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण, अभिनेता आता त्याच्या चित्रपटामुळे नाही, तर एका जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे. अक्षय कुमार पुन्हा एकदा शाहरुख खान व अजय देवगणसह एका पान मसालाच्या जाहिरातीत झळकला आहे. या जाहिरातीचा व्हिडिओ समोर येताच नेटकरी अक्षयवर टीकेची झोड उठवत आहे. (Akshay Kumar troll on Pan Masala Ad)
साधारण वर्षभरापूर्वी जेव्हा अक्षयने याच अभिनेत्यांसह एका पान मसाल्याची जाहिरात केली होती. तेव्हा त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तसेच, अभिनेत्याला नेटकऱ्यांच्या जोरदार ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. तेव्हा त्याने एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्याने आपण यापुढे या पान मसाला ब्रँडची जाहिरात करणार नसल्याचे सांगत चाहत्यांची माफी मागितली होती. मात्र, आता तो पुन्हा एकदा त्याच अभिनेत्यांसह त्याच पान मसाला ब्रँडची जाहिरात करताना दिसला. त्याची ही जाहिरात सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये असं दिसतं की, शाहरुख व अजय एका कारमध्ये बसले असून हे दोघे अक्षयच्या येण्याची वाट पाहतात. मात्र, अक्षय हेडफोन लावून गाणी ऐकण्यात व्यग्र असतो. त्यामुळे शाहरुख घरातील खिडकीवर बॉल फेकून अक्षयचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. पण त्याकडेही तो दुर्लक्ष करत असल्याने शाहरुख व अजय त्याची वाट पाहतात. अखेर अजय त्याच्या खिशातील पान मसाल्याचं पाकीट काढून ते उघडतो. तेव्हा अक्षय त्यांना प्रतिसाद देतो आणि हे तिघे त्या कारमधून निघालेले दिसतात. या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकताच नेटकऱ्यांनी अक्षयला जोरदार ट्रोल करत आहे.
हे देखील वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर दत्तू मोरेचा दांडिया डान्स, तर ओंकार राऊतचा गरबा पाहून तुम्हालाही हसू होईल अनावर
Vimal brothers are back pic.twitter.com/DyljYbXcUG
— Syed Irfan Ahmad (@Iam_SyedIrfan) October 8, 2023
एक नेटकरी यावर म्हणाला, “अक्षय कुमार आधी पान मसाल्याची जाहिरात करणार नव्हता, मग आता काय झालं?”. तर “पैशांसाठी अक्षय कुमार काहीही करू शकतो”, अशी कमेंट करत नेटकऱ्याने अक्षयला ट्रोल केलं आहे. एकूणच अक्षयच्या पान मसालाच्या जाहिरातींमुळे त्याचे चाहते मात्र प्रचंड नाराज झाले आहेत.
हे देखील वाचा – शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, राज्य सरकारने अभिनेत्याची सुरक्षा वाढवली, धमक्या येण्यामागचं नेमकं कारण काय?
अक्षय कुमारने जेव्हा प्रथमच या पान मसाला ब्रँडची जाहिरात केली होती. तेव्हा नेटकऱ्यांनी त्याला जोरदार ट्रोल केले होते. त्यानंतर त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट करत चाहत्यांची माफी मागितली होती. तसेच, आपण यापुढे तंबाखू, पान मसाला व अन्य पदार्थ ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल, अश्या कोणत्याही पदार्थांची जाहिरात करणार नसल्याचे त्याने जाहीर केले होते. मात्र, माफी मागून देखील तो पुन्हा या जाहिरातीत दिसल्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलल्यास, नुकताच त्याचा ‘मिशन राणीगंज’ चित्रपट प्रदर्शित झाला.