Deepali Pansare On Depression : प्रेग्नन्सीमुळे अनेकदा महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या दरम्यान महिलांना विशेषतः मानसिक ताण-तणावाचा सामना करावा लागतो. प्रेगन्सीनंतर येणाऱ्या या डिप्रेशनला पोस्टपार्टम डिप्रेशन असे संबोधले जाते. या पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये एक मराठमोळी अभिनेत्री अडकली होती असल्याचं नुकतंच समोर आलं. छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्री काळ कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी होतात. त्यांची भूमिका आणि अभिनय इतका सशक्त असतो की प्रेक्षक मालिका संपली तरी त्या कलाकारांना त्या पात्राच्या नावाने ओळखतात. अशीच अभिनेत्री ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती ती म्हणजे दीपाली पानसरे. दीपालीने तिच्या प्रेग्नन्सीनंतरच्या काळात पोस्टपार्टम डिप्रेशनचा सामना केला.
नुकतीच दिपालीने ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने प्रेग्नन्सीनंतर येणाऱ्या डिप्रेशनबाबत बरंच भाष्य केलं. आणि तिने या नैराश्याचा कसा सामना केला हेदेखील सांगितले. दीपाली म्हणाली की, “प्रेग्नन्सीनंतर येणाऱ्या डिप्रेशनबाबत फार कमी बोललं जातं. एखादी स्त्री मग ती घरकाम करणारी असुदे वा बाहेर जाऊन काम करणारी असूदेत. मी तर खूप काम करणारे होते. पण प्रेग्नन्सीच्या काळात हार्मोनल बदल आपल्याला जाणवतात आणि एखादा अतिशय आवडणारा पदार्थ आपल्याला आवडायचा बंद होतो. परफ्युमचा सुगंध आपल्याला आवडेनासा होतो”.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मध्ये आठ वर्षांनी येणार दयाबेन, शूटिंगही केलं सुरु, दिशा वकानी ‘या’ भूमिकेत पुन्हा दिसणार का?
पुढे ती म्हणाली, “डिलिव्हरीनंतर जेव्हा एक जीव आपल्या हातात येतो तेव्हा खूप प्रेशर असतं. माझ्याकडे तर सासू-सासरे आणि आई-वडील कोणीच नव्हते. तर मी, माझा नवरा आणि माझा मुलगा यांत मी खूप पझेसिव्ह आई झाली. प्रेग्नन्सीनंतरच्या एका वर्षात शरीर प्रचंड बदलतं. तुम्ही पहिल्यासारखे दिसत नाहीत, तुमचे इमोशन्स बदलतात. या सगळ्यात कामाचं तसेच आपण ओढावून घेतलेल्या कामाचं इतकं प्रेशर होतं की मी प्रेग्नंसीनंतर डिप्रेशनमध्ये गेले. आणि हे भयंकर झाले होते. माझा मुलगा रुहान पाच महिन्याचा होता तेव्हा मी माझे लांब सडक केस कापून बॉबकट करुन आले. केसांमुळे माझा दिवसभरातील अर्धा तास वाया जात होता हेसुद्धा मला नकोस झालं होतं”.
यातून बाहेर येत तिने कामाला कशी सुरुवात केली याबाबत बोलताना दीपाली म्हणाली, “खूप लोकांना प्रेग्नसीनंतर येणारं डिप्रेशन कळत नाही. यावेळी तुम्हाला वाटणाऱ्या गोष्टी कोणासह तरी शेअर करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामधून बाहेर पडणंही तितकंच आवश्यक आहे. दीड-दोन वर्ष मी माझ्या मुलाचं खूप केलं. सुरुवातीचे सहा महिने तर माझा मुलगा झोपायचाच नाही त्यामुळे मीही जागी असायचे. माझी ही तारांबळ पाहून माझा नवरा आणि माझी आई यांनी मला सांगितलं तू आता वेडी होशील. तू काम सुरु कर. प्रेग्नन्सीदरम्यान माझं वजनही खूप वाढलं होतं त्यामुळे आता काम कसं हा प्रश्न होता. पण अशातही मला पहिली जाहिरात मिळाली आणि मी हळूहळू काम सुरु केलं”.