Paaru Marathi Serial : ‘पारू’ या मालिकेत सध्या खूप मोठं वळण आलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेत अनुष्काच्या एन्ट्रीने किर्लोस्कर कुटुंबात ताटातूट झाली आहे. तर अनुष्काने अहिल्यादेवींच्या मनात घर करत पारूला त्यांच्या मनातून उतरवण्याचा डाव आखला आहे. दिशाची बहीण अनुष्का ही बहिणीच्या अपमानाचा बदला घ्यायला आली आहे. आणि या बदल्याची सुरुवात तिने पारुपासून करायचं ठरवलं आहे. दिशानेही सर्वात आधी पारूला बाजूला कर असा सल्ला तिची बहीण अनुष्काला दिलेला असतो. तर आदित्यच्या मनातही अनुष्काने घर केलं असून ती पारूच्या चुका वेळोवेळी त्याच्यासमोर आणताना दिसत आहे. जेणेकरुन आदित्यही पारूचा तिरस्कार करु शकेल.
मालिकेत अहिल्यादेवी सर्व कुटुंबासमोर असं घोषित करतात की, “आजपासून किर्लोस्कर कंपनीची नवी ब्रँड अँबेसेडर म्हणून अनुष्का काम बघेल”. हे ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. तर पारूचाही चेहरा बघण्यासारखा होतो. त्याचवेळी अनुष्का आदित्यकडून सहानुभूती मिळवण्यासाठी त्याला फोन करुन पारू स्वतःच ब्रँड अँबेसेडर होण्यास तयार नसल्याचं सांगते. हे ऐकून आदित्यही घाबरतो. तो त्याचवेळी बोलायला म्हणून पुढे येतो मात्र अहिल्यादेवी हाताने इशारा करुन त्याला थांबवतात.
पारूचा हा निर्णय आदित्यला काही पटलेला नसतो. पारूच्या निर्णयानंतर आदित्य खूप त्रागा करतो. इतकंच नाही तर पारूचा पळकुटेपणा पाहून आदित्य रागाच्या भरात स्वतःला त्रास करुन घेतो, आणि त्याला दुखापत होते. त्यानंतर पारू काळजीपोटी त्याला मलमपट्टी करायला जाते. त्याचवेळी अहिल्यादेवीही आदित्यला मलमपट्टी करायला येतात मात्र पारूला आदित्यजवळ पाहून त्या दाराबाहेरच थांबतात. आदित्य व पारूला एकत्र पाहून अहिल्यादेवींच्या मनात पारूबद्दल गैरसमज निर्माण होतो.
मालिकेत सुरु असणारी ही रंजक वळण प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नाही आहेत. प्रोमो पाहून नेटकरी सोशल मीडियावर कमेंट करत मालिकेला, मालिकेच्या कथानकाला ट्रोल करत आहेत. हा प्रोमो पाहून नेटकरी असं म्हणत आहेत की, “अहिल्यादेवींचं डोकं फिरलं आहे, हिला बिलकुल माणसं ओळखता येत नाही”, “फालतू मालिका बंद करा आम्ही आता बघत पण नाही”, “मालिकेत सगळं फालतू दाखवत आहेत”, “एंगेजमेंट विसरा, तिचे लग्नही झालेले नाही आणि दिशाप्रमाणे ती किर्लोस्करच्या घरी राहते. एवढंच काय तर अहिल्यादेवीच्या नजरेतून काहीही लपवता येत नाही असं म्हणतात पण प्रत्येक वेळी पारू सगळं दुरुस्त करते”, “सिरीयल बंद करुन टाका”.