‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या यशाचं सर्वत्र जोरदार कौतुक होताना पाहायला मिळतंय. सहा बहिणींभोवती फिरणार हे कथानक अत्यंत मार्मिकतेने मांडण्यात आलं आहे. प्रेक्षकांसोबतच कलाकार मंडळीनींही हा चित्रपट एका उंचीवर नेऊन ठेवला. बरेच कलाकार मंडळी मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. सर्व सामान्य प्रेक्षकवर्ग ते कलाकार मंडळी चित्रपट पाहून झाल्यावर प्रतिक्रिया देत आहेत, अशातच अभिनेते अशोक सराफ यांनी देखील ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहून प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अशोक मामांनी एक मुद्दा अधोरेखित करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Ashok saraf statement)
चित्रपट पाहिल्यानंतर अशोक सराफ असे म्हणाले की, “‘बाईपण काय भारी’ आहे हे दाखवायला लोक पुढे येतील पण, पुरुषांच भारीपण कुणी दाखवणार नाही. पुरुषाच भारी पण हे नकळत ठरलं जातं आणि ते फक्त जाणवून घेण्यापर्यंतच असतं. त्याचा कुणी गवगवा करत नाही कधी. स्त्रिया आपल्या मनातल्या भावभावना, दुःख मैत्रिणीसमोर किंवा नवऱ्यासमोर व्यक्त करत असतात.
पाहा अशोक सराफ यांनी बाईपण भारी देवा चित्रपट पाहून काय दिली प्रतिक्रिया (Ashok saraf statement)
पण, पुरुष मंडळी यावर कायम मौन बाळगून असतात. आपली दुख, त्रास, आर्थिक संकट ती कधीच कोणासमोर उलगडताना दिसत नाहीत आणि त्यावर कधीच मनमोकळेपणाने बोलत नाहीत. गप्प राहून ते या त्रासाला सामोरे जातात,” असं अशोक सराफ म्हणाले.
हे देखील वाचा – ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची INSIDE STORY आली समोर, खऱ्या सहा बहिणी आल्या समोर
अशोक सराफ यांनी अधोरेखित केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेत असून अनेक स्त्रियांनाही त्यांचं म्हणणं पटलं असल्याचं समोर आलं आहे. सिनेसृष्टीत अशोक सराफ यांचा चांगलाच दबदबा आहे. स्वमेहनतीच्या जोरावर त्यांनी आजवर प्रेक्षकांच्या मनात स्वतःच स्थान निर्माण केलं असून ते टिकवूनही ठेवलं आहे. आता अशोक सराफ यांच्या वक्तव्याप्रमाणे पुरुषांचं भारी पण दाखवणारा चित्रपट येणार का हे पाहणं रंजक ठरेल.
