Devendra Fadnavis On Chhaava Movie : बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. २० दिवसांहून अधिक दिवस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तग धरुन आहे आणि बक्कळ कमाई करताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट आहे. अभिनेता विकी कौशलने या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाने अनेक हिट चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले. चित्रपट पाहून प्रेक्षकांनी कलाकारांचे तोंडभरुन कौतुक केले. महाराजांची शौर्यगाथा पाहून तर अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. दरम्यान, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधिमंडळ सदस्य आणि मंत्र्यांसाठी ‘छावा’ चित्रपटाच्या शोचे मुंबईत आयोजन केलं होतं.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ‘छावा’ चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘छावा’ चित्रपटाचं कौतुक केलं. तसेच चित्रपटातील कलाकारांचंही कौतुक केलं आहे. चित्रपट पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाबाबतच्या भावना व्यक्त केल्या. “छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडित, कवी आणि लेखक देखील होते. पण त्यांच्यावर इतिहासकारांनी अन्याय केला. मात्र, छावा चित्रपटाच्या माध्यमातून तो अन्याय दूर झाला”, असं लक्षवेधी विधानही त्यांनी यावेळी केलं.
आणखी वाचा – अभिनयाची सुरुवात, वेबसीरिजसाठी मेहनत ते अभिमानास्पद काम; ‘मैत्रीचा ७/१२’मधील योगिताचा प्रेरणादायी प्रवास
LIVE | 'छावा' चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 5, 2025
🕡 संध्या. ६.२८ वा. | 5-3-2025📍मुंबई.#Maharashtra #Mumbai #Chhaava https://t.co/3ceOsbN5nw
यावेळी देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराज फक्त वीर नव्हते तर त्यांचं शौर्य, त्यांची वीरता, त्यांची विद्वत्ता या सर्वच गोष्टी अतुलनीय होत्या. छत्रपती संभाजी महाराजांना ११ भाषा ज्ञात होत्या. ते संस्कृतचेही पंडित होते, ते कवी होते, ते लेखक होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या संपूर्ण चरित्रावर एक प्रकारे इतिहासकारांनी खूप अन्याय केला. खरं तर देशभरात त्यांचं व्यक्तिमत्व जायला पाहिजे होतं, पण ते दुर्दैवाने गेलं नव्हतं. आपण सर्वांनी ‘छावा’ पुस्तक वाचलं असेल, पण कदाचित देशातील काही लोकांनी वाचलं नसेल. पण आता या ‘छावा’ चित्रपटामुळे संपूर्ण देशात छत्रपती संभाजी महाराज काय होते? हे पोहोचवण्याचं काम चित्रपटातील संपूर्ण टीमने केलं आहे. त्यामुळे या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो”.
पुढे ते असंही म्हणाले की, “सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण संपूर्ण चित्रपट पाहिला. कुठेही इतिहासाशी प्रातरणा न करता, जी ऐतिहासिक तत्त्व आहेत, ती तत्त्व कायम ठेवून त्या तत्त्वांना चित्रपटात परिवर्तित करण्याचं काम या संपूर्ण टीमने केलं. त्यामुळे मी ‘छावा’च्या संपूर्ण टीमला धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा आमच्यासमोर जीवित करण्याचं काम चित्रपटातील संपूर्ण टीमने केलं आहे. खरोखर ‘छावा’ चित्रपट खूप सुंदर बनवण्यात आला आहे”.