Ashok Saraf Saluted Nivedita Saraf : मराठी मनोरंजनविश्वातील नेहमीच चर्चेत असणार आणि लोकप्रिय जोडपं म्हणजे दिग्गज अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ. अशोक व निवेदिता सराफ यांनी आजवर नाटक, मालिका व चित्रपटांमधून अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठीच नाही तर हिंदी भाषेतही त्यांचा वावर मोठा असलेला पाहायला मिळाला. या जोडीने एकत्रही आजवर बरंच काम केलं आहे. आणि अजूनही दोघेही मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात अशोक मामा आणि निवेदिता यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
अशोक सराफ यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना गेल्यावर्षी ‘महाराष्ट्र भूषण’ व यावर्षी ‘पद्मश्री’ हे दोन प्रतिष्ठित व मानाचे समजले जाणारे पुरस्कार मिळाले. यांनतर आता त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देखील जीवनगौरव पुरस्कार देत सन्मानित करण्यात आलं आहे. कलाविश्वातील योगदानाबद्दल त्यांचा ‘जीवनगौरव’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यांचे कलाविश्वात योगदान लक्षात घेता यंदाच्या ‘झी चित्र गौरव’ (Zee Chitra Gauarv 2025) पुरस्कार सोहळ्यात त्यांचा ‘जीवनगौरव’ या पुरस्काराने सन्मान केला.
या व्हिडीओमध्ये निवेदिता सराफ मंचावर ट्रॉफी हातात घेत असं म्हणताना दिसत आहेत की, “अशोक. तू इथे आल्याशिवाय मी हा पुरस्कार स्वीकारुच शकत नाही”. त्यानंतर अशोक सराफ हसत हसत मंचावर जातात आणि ते निवेदिता यांना वाकून नमस्कार करतात. अशोक मामांची ही कृती अनेकांना भावली. यावेकी सोहळ्यातील उपस्थित मंडळी टाळ्या वाजवत दोघांचंही कौतुक करतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्या खास नात्याचंही अनेकांनी कौतुक केलं आहे.
हा पुरस्कार स्वीकारताना निवेदिता सराफ भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. “काय बोलू, मी खूप भावनिक झालीये. हा पुरस्कार खरंतर माझ्या माहेरचा पुरस्कार आहे” अशा शब्दांत त्यांनी या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, येत्या ८ मार्च रोजी ‘झी मराठी वाहिनी’वर ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.