Maitricha Saatbara Interview : ‘आठवी अ’, ‘पाऊस’, ‘दहावी अ’ वेबसीरिजच्या भरघोस यशानंतर आणखी एका वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु झाली. ती वेबसीरिज म्हणजे ‘मैत्रीचा ७/१२’. या वेबसीरिजचं पोस्टर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये याबाबत उस्तुकता होती. अखेरीस ‘मैत्रीचा ७/१२’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोशल मीडियाद्वारे तर ‘मैत्रीचा ७/१२’ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचनिमित्त या सीरिजच्या कलाकारांशी आपण गप्पा मारणार आहोत. या सीरिजमध्ये योगिता हे पात्र साकारणारी प्रियांका गांधी हिच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करुया आजच्या गप्पा…
अभिनयक्षेत्रातील तुझा प्रवास कसा सुरु झाला?, आणि ‘मैत्रीचा ७/१२’ या वेबसीरिजसाठी तुझी निवड कशी झाली?
मला लहानपणापासून अभिनयाची आवड आहे. अगदी शाळेत असतानापासून माझ्यातील ही कला पाहून आई-बाबा मला वेगवेगळ्या शिबिरांमध्ये पाठवायचे. शाळेत असताना मी नाटक विभागात असल्याने माझी ही आवड वाढत गेली. सातवीत असताना मी शाळेच्या गॅदरिंगमध्ये ती फुलराणी नाटक केलं आणि ते पाहून माझं खूप कौतुक झालं. त्याचवेळी मला अभिनयात काहीतरी करु शकते याची खात्री पटली. कॉलेजमध्ये गेल्यावर मी अनेक स्पर्धा देत गेले. आणि त्यानंतर अभिनयातील ही वाटचाल सुरु राहिली. सातबारा वेबसीरिजबदल बोलायचं तर मला एका माझ्या मित्राकडून ऑडिशनसाठी कॉल आला होता. सुरुवातीला एक ऑनलाईन ऑडिशन पाठवली. योगिता या पात्राचा सारासार विचार करुन मी ऑडिशन दिली. आणि त्यांना ती ऑडिशन आवडली, आणि त्यांनी प्रत्यक्षात भेटण्यास बोलावलं. तेव्हा त्यांनी मला इतर पात्रांसह एक सीन करण्यास सांगितला आणि ही ऑडिशनही खूप मस्त गेली. आणि अखेर त्यांनी कॉल करुन माझी निवड झाल्याचं सांगितलं.
योगिता पात्रासाठी तू कशी तयारी केलीस?, आणि हे पात्र सत्यात उतरवण्यासाठी तू काय केलंस?
सुरुवातीला दिग्दर्शक अजय सरांनी योगिता कशी आहे त्याबाबत सांगितलं. माझं पात्र हे माझ्या वयापेक्षा खूप जाणतं होतं, त्या पात्राचं स्वतःच कॅफे आहे त्यामुळे हे पात्र जबाबदारीच आहे याचा आधीच मला आढावा देण्यात आला होता. तिचा स्वभाव, तिची उत्तर देण्याची पद्धत, तिचा समजूतरदारपणा, राग आल्यानंतरची वागणूक, हसतानाची एक विशिष्ट पद्धत, आनंदी असतानाची वागणूक या सगळ्याचा साधारण विचार मी केला.
या वेबसीरिजला होकार देण्यामागचं तुझं खास कारण काय होतं?
माझं या वेबसीरिजला होकार देण्याचं एक खास कारण होतं ते म्हणजे एखादं पात्र मी जास्त काळ सुरु असताना कसं करु शकते. म्हणजे दोन-अडीच तिने महिने एक पात्र सलग कॅमेरासमोर साकारणं. हे यापूर्वी मी कधीच केले नाही आहे. आणि माझ्यातील क्षमतेने मी हे करु शकते का हे मला स्वतःला पाहायचं होतं. दरदिवशी कॅमेरासमोर उभं राहायला मिळणं ही गोष्ट मला खूप मोठी वाटली.
सहकालाकरांबरोबर तुझा बॉण्ड कसा होता?, आणि सेटवर एकत्र असतानाच्या धमाल, मस्तीचे अनुभव सांगशील का?
आम्ही सगळेच शूटिंगदरम्यान एकमेकांशी खूप जवळचे मित्र झालो. शूट सुरु झाल्यानंतर सीन चित्रित होत गेले त्यामध्ये आमची मैत्री अधिक घट्ट व्हायला, एकमेकांची ओळख व्हायला आम्हाला खूप मदत झाली. इतरवेळी आम्ही सेटवर खूप मज्जा,मस्ती करायचो त्यामुळे सीनमध्ये देखील ते दिसून यायचं. गमतीशीर किस्से असे बरेच घडले आहेत. पहिल्या श्येड्युलचा पाचवा दिवस असेल. त्या दिवशी असं घडलं की, एखाद्या एपिसोडचा शेवटचा सीन असेल त्याचा शेवटचा डायलॉग झाला की दिग्दर्शकडून कट असं म्हटलं जायचं. आणि त्यावेळी आमचा सीन खरंतर करुन झाला होता, डायलॉग संपला होता आणि समोरुन कट हे आलंच नाही. कॅमेरा रोल असल्याने असं झालं की कट आला नाही म्हणजे सीन आपापल्या पद्धतीने आपल्याला पुढे न्यायचा आहे अशा नजरेने आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि आमच्यातील बॉण्डिंगमुळे हा सीन एका वेगळ्याच लेव्हलला गेला. आणि पात्र साकारताना त्यात अधिक भर कशी घालायची हे आम्हाला शिकायला मिळालं, आणि त्यापुढच्या सीनमध्ये आम्ही स्वतःहून हे करत गेलो. तर हा एक आठवणारा किस्सा आहे.
मला विचारायला आवडेल की, तुमच्यातील हे बॉण्डिंग खूप स्ट्राँग होतं मग शूटचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा होता?
हो. खरंच खूप जड होता. तो क्षण आठवतोय की, शूटिंग नेहमीप्रमाणे सुरु होतं. तेव्हा आम्हा कोणाला हे जाणवतंही नव्हतं की शेवटचा दिवस आहे. माझाच शेवटचा शॉट सुरू होता आणि शेवटचं वाक्य संपताच कट असा समोरुन आवाज आला. त्यानंतर आम्ही सगळे सुन्न झालो. चित्रीकरण संपल्याने आता आपण सगळे घरी जाणार, पुढचा सीजन कधी येईल हे काही माहित नाही, पण आता बॅगा भरुन घरी जायचं हे जेव्हा सर्वांच्या लक्षात आलं तेव्हा आम्हाला रडू आवरेना झालं. आमच्यासाठी हा खूप कठीण क्षण होता.
‘मैत्रीचा ७/१२’ वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर तुला तुझ्या कुटुंबाकडून काय प्रतिक्रिया आल्या?, आणि सोशल मीडियावर तुला कसा प्रतिसाद मिळाला?
माझ्या कुटुंबाकडून तर मला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सांगायचं झालं तर अगदी लहानपणापासून मला माझ्या कुटुंबाची साथ मिळाली आहे. जेव्हा त्यांना या सीरिजबद्दल, पात्राबद्दल कळलं आणि सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी माझं काम पाहिलं तेव्हा त्यांना माझी अभिनयातील प्रगती, मेहनत दिसली आणि त्यांनी माझं कौतुक केलं. ते खूप खुश होते. तर मित्र-मैत्रिणींनीही कौतुकाचा वर्षाव केला.
‘मैत्रीचा ७/१२’ प्रेक्षकांनी का पाहावा?, आणि पुढील एपिसोडमध्ये प्रेक्षकांना अजून काय गमतीजमती पाहायला मिळतील?
‘मैत्रीचा ७/१२’ ही वेबसीरिज खूप सकारात्मकता पसरवणारी वेबसीरिज आहे. कुठेही नकारात्मकता तुम्हाला जाणवणार नाही. तुमचे जुने दिवस, तुमचे मित्र-मंडळी, तुमचा ग्रुप याची ही वेबसीरिज पाहून तुम्हाला नक्की आठवण येईल.