‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय शो ‘जाऊ बाई गावात’ या नव्या रिऍलिटी शोची घोषणा करण्यात आली तेव्हापासून या कार्यक्रमाची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेता हार्दिक जोशीने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. हा शो सुरु होण्याआधीच हार्दिकच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. हार्दिकच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं. त्याच्या वहिनीच्या निधनाच्या बातमीने हार्दिक व त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली होती. (Hardeek Joshi On Jau Bai Gavaat)
डोळ्यात पाणी यावं अशी भावुक पोस्ट हार्दिकने शेअर केली होती. त्याची ही पोस्ट पाहून हार्दिकही हळहळला. त्याच दरम्यान हार्दिकचा नवा शो जाऊ बाई गावात येणार होता. वहिनी आजारी असताना, ती हॉस्पिटलमध्ये असताना हार्दिक शूटिंगला जाता येणार नसल्याने तो या शोला नकार देणार होता. या शोविषयीच्या भावना अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केल्या आहेत.
हार्दिकने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, “हा शो मला खूप जवळचा आहे. माझी वहिनी खूप आजारी होती आणि त्याचवेळी मी या शोमधून बाहेर पडणार होतो. पण, जेव्हा माझ्या वहिनीला समजलं की, मी ‘जाऊ बाई गावात’ला नकार देणार आहे. तेव्हा हॉस्पिटलमध्ये तिनं तिच्या हातात माझा हात घेतला आणि माझ्याकडून वचन घेतलं की, हा शो तू सोडायचा नाहीस” असं तो म्हणाला.
यापुढे हार्दिक म्हणाला, “मी सुरू केलेल्या कामातून कधीच माघार घेत नाही हे तिला माहीत होतं. हा शो मी फक्त तिच्यामुळे करत आहे. योगायोग असा आहे की, ‘जाऊ बाई गावात’चा पहिला भाग माझ्या वाहिनीच्या वाढदिवसादिवशी प्रसारित झाला. पण तो कार्यक्रम बघायला ती आज आपल्यात नाही. ‘जाऊ बाई गावात’ सुरू झाल्यापासून सगळ्यांकडून प्रोत्साहन मिळालं”, असंही त्याने सांगितलं.