Salaar Twitter Review : शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच एका दिवसानंतर प्रभासचा ‘सालार’ चित्रपटही चित्रपटगृहात दाखल झाला आहे. ‘KGF 2 ‘ चे दिग्दर्शक प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार’चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित झाली होती. मूळ तेलुगू भाषेतील हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम व कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. काही काळापासून प्रभासचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसलेले नाहीत.
‘आदिपुरुष’, ‘राधेश्याम’ सारख्या चित्रपटांना मिळालेल्या अपयशानंतर प्रभासची कारकीर्द जवळपास संपली आहे, असे सर्वांना वाटत होते. मात्र ‘सालार’ने प्रभासची बुडणारी नौका वाचवली की नाही याचा निर्णय आता प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दिला आहे. प्रभासच्या ‘सालार’ या चित्रपटाचा पहिला भाग सालार: भाग १ द सीझफायर अखेर प्रेक्षकांसमोर आला आहे.
आदिपुरुषने केलेल्या टीकेनंतर प्रभासला अखेर ‘सालार’ चित्रपटातून सुटकेचा नि:श्वास सोडता आला आहे, कारण प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाद्वारे प्रभास त्याच्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाचा विक्रम मोडणार असल्याचेही अनेक यूजर्स म्हणत आहेत. एका यूजरने लिहिले की, “सालार एक नवा रेकॉर्ड बनवण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटाची आगाऊ बुकिंग ही फक्त सुरुवात आहे”.
तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की, “एका शब्दात हा चित्रपट प्रभास व पृथ्वीराज सुकुमारन यांच्यातील मैत्री दाखवतो. या चित्रपटाच्या सिक्वेलची आम्ही वाट पाहू शकत नाही”. सोशल मीडियावर चाहते प्रभासच्या अभिनयाचे कौतुक करताना थकत नाही आहेत. आणखी एका यूजरने लिहिले आहे की, “प्रभास आणि प्रशांत नीलच्या जोडीने स्क्रीनला आग लावली आहे”. तर दुसऱ्या एकाने, “चित्रपटात ज्या पद्धतीने ऍक्शन सीन चित्रित करण्यात आले आहेत ते जनप्रेमींसाठी एक मेजवानी आहे”.