दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या डीपफेक व्हिडिओवरून सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ समोर येताच तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि यावरून अवघ्या देशभरात चर्चा रंगली. रश्मिकाने स्वत: याविरोधात आवाज उठवत तिच्या सोशल मिडियावरून एक पोस्ट शेअर करत कारवाईची मागणी केली. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अगदी केंद्रीय मंत्र्यांनीदेखील याप्रकरणी तिला पाठिंबा दर्शविला. ही बातमी ताजी असतानाच आता बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या एका फोटोबरोबरदेखील छेडछाड करण्यात आल्याचे समोर आलं आहे. (Katrina Kaif Deepfake Video Viral)
कतरिना कैफ ही तिच्या आगामी ‘टायगर-३’ या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या चर्चेत आहे. चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यापासूनच कतरिनाचा तो टॉवेल सीन खुप चर्चेत होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तिच्या फोटोबरोबर छेडछाड करण्यात आली आहे आणि हा फोटो अश्लील पद्धतीने एडिट करण्यात आला असल्याचं समोर आलं आहे. हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल करून चित्रपटाबाबत नकारत्मकता पसरवण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.
चित्रपटातील हा सीन कसा शुट झाला याबाबत कतरिनाने प्रतिक्रिया दिली होती. सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत ती म्हणाली होती की, “मला पडद्यावर ऍक्शन सीन करायला आवडतात आणि टायगर फ्रँचायझीने मला नेहमीच महिला ऍक्शनपटाची नायिका बनण्याची संधी दिली आहे”. सध्याच्या नवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर करून आधी रश्मिका आणि आता कतरिनाचा फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट केल्यामुळे सोशल मिडियावर चाहत्यांकडून याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. तसेच असे फोटो आणि व्हिडिओ एडिट करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.
Thankyou for standing up for me sir, I feel safe in a country with leaders like you. https://t.co/rD9umXhKEn
— Rashmika Mandanna (@iamRashmika) November 6, 2023
अद्याप या फोटोप्रकारानी कतरिना कैफने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर अशीच घटना घडलेल्या अभिनेत्री रश्मिका मंदानाने तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नाराजी व्यक्त करत म्हटलं की, “माझा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, हे पाहून मला खूप दुःख झालं आहे. याबद्दल बोलणं गरजेचं आहे. हे फक्त माझ्यासाठीच धक्कादायक नाही तर आपणा सर्वांसाठीच धक्कादायक आहे, कारण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. एक महिला व एक अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि शुभचिंतकांचे आभार मानते कारण ते माझे संरक्षक आणि सपोर्ट सिस्टिम आहेत.”