‘ऍनिमल’ या आगामी चित्रपटामुळे अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या चर्चेत आहे. याशिवाय रश्मिका आणखी एका कारणामुळे विशेष चर्चेत आली आहे. रश्मिका मंदानाच्या एका फेक व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या फेक व्हिडीओमुळे रश्मिका पुन्हा चर्चेत आली असून तिचा हा फेक व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रश्मिकाचा मॉर्फ केलेला व्हिडीओ पाहून यावर अमिताभ बच्चन यांनीही पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली. तर तिच्या चाहत्यांनीही कारवाईची मागणी केली. (Rashmika Mandanna Viral Video)
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे आणि तिने अतिशय घट्ट व बोल्ड कपडे परिधान केले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.या व्हायरल व्हिडीओवर चिंता व्यक्त करत अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, “कायदेशीर दृष्टिकोनातून हे एक गंभीर प्रकरण आहे.” तसेच चाहतेही या व्हिडीओवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
Thankyou for standing up for me sir, I feel safe in a country with leaders like you. https://t.co/rD9umXhKEn
— Rashmika Mandanna (@iamRashmika) November 6, 2023
बिग बींनी दर्शविलेल्या पाठिंब्यासाठी रश्मिकाने त्यांचे आभार मानले आहेत. “माझ्यासाठी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद सर, या देशात मला तुमच्यासारख्या लोकांमुळे सुरक्षित वाटते,” असं कॅप्शन देत एक पोस्ट तिने ट्विट केली आहे. याआधी या व्हिडीओवरून रश्मिकाने ही नाराजी दर्शवत एक नोट सोशल मीडियावरून शेअर केली होती.
रश्मिकाने या व्हिडिओवर नाराजी व्यक्त करत म्हटलं होतं की, “माझा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, हे पाहून मला खूप दुःख झालं आहे. याबद्दल बोलणं गरजेचं आहे. हे फक्त माझ्यासाठीच धक्कादायक नाही तर आपणा सर्वांसाठीच धक्कादायक आहे, कारण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. एक महिला व एक अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि शुभचिंतकांचे आभार मानते कारण ते माझे संरक्षक आणि सपोर्ट सिस्टिम आहेत.”