मराठी चित्रपटातील संगीतमय कलाकृती म्हणून ज्या चित्रपटाकडे पाहिलं जातं तो चित्रपट म्हणजे ‘कट्यार काळाजात घुसली’. सुबोध भावे दिग्दर्शित हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट म्हणजे मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचं मोठ्या पडद्यावरील रुपांतरण आहे. या संगीतमय चित्रपटानंतर आता सुबोध भावे नवीन चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुबोधने नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली. ज्या पोस्टमध्ये संगीतमय नाटकाच्या आणखी एका कलाकृतीचा मुहुर्त करण्यात आला असं सांगितलं. (new musical movie announcement)
सुबोधने चित्रपटाच्या मुहुर्ताचा फोटो व व्हिडिओ शेअर करत कॅप्शन दिलं, ‘’कट्यार’नंतर पुन्हा एखादी संगीतमय कलाकृती सादर करावी अशी आम्हा सर्वांची इच्छा होती. अखेर सर्वांच्या प्रयत्नांला यश आलं. आज आम्ही कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या संगीत ‘मानापमान’ या नाटकावरून प्रेरित असलेल्या ‘मानापमान’ या आगामी संगीतमय चित्रपटाचा मुहुर्त पुण्यातील FTII च्या पवित्र जागेत केला. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद कायम आमच्या सोबत असू द्या! मोरया!’, असं लिहीत नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहुर्त केला आहे.
याबरोबर त्याने व्हिडिओही शेअर केला होता. त्यात तो सांगतो, “ मी आता माझ्या अत्यंत आवडत्या जागी आहे. जिथून मला नेहमी उर्जा मिळत आली आहे. जिथे आल्यानंतर आयुष्यात काहीतरी प्रचंड भारी काम करावं असं वाटतं. ती जागा म्हणजे पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचा कॅम्पस. मी जिथे उभा आहे त्याला शांताराम पॉन्डस असे म्हणतात. मी FTII चा विद्यार्थी नाही, पण जेव्हा मी इथं पुण्यात येतो तेव्हा मला आयुष्यात कायम काहीतरी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. कारण ज्या लोकांनी प्रभात स्टुडिओची स्थापना केली. ज्यांनी या स्टुडिओच्या सगळ्या चित्रपटांमध्ये काम केलं अशा सर्व पडद्यावरील व पडद्यामागील त्या सर्वांचे आशिर्वाद, त्यांची ऊर्जी या जागेत आहे. इथे आल्यानंतर मला ती सकारात्मकता जाणवते. त्यामुळे माझा नेहमी प्रयत्न असतो की माझ्या कोणत्याही कामाची सुरुवात ही या जागेचा आशिर्वाद मिळून करावी”.
पुढे तो सांगतो की, “‘कट्यार काळजात खुसली’ या चित्रपटाचा मुहुर्त मी याच ठिकाणी केला होता. माझ्या एका बेव सिरीजची सुरुवातही मी इथूनच केली होती”, असं सांगत त्याने पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचा कॅम्पसशी त्याचं असलेलं नातं ही या व्हिडीओतून स्पष्ट केलं.