छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिकेसह मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. अरुंधती, अनिरुद्ध, आप्पा, कांचन, ईशा यासह इतर अनेक कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यापैकी इशाच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारणारा साहिल म्हणजेच अभिनेता अद्वैत कडणेची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती.
‘आई कुठे काय करते’ मालिकेत ईशा-अद्वैत यांच्या लव्हस्टोरीचा ट्रॅक दाखवण्यात आला होता तो प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. त्याची ही भूमिका काही काळासाठीच होती. मात्र अल्पावधीतच अद्वैतने त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेनंतर अद्वैत आता झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेविषयी स्वत: अद्वैतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. त्यात त्याने मालिकेचा एक फोटोही शेअर केला आहे.
अद्वैत ‘नवरी मिळे हिटलरला’ या नव्या मालिकेत झळकला असून मालिकेत अद्वैत हा विक्रांत या भूमिकेत दिसणार आहे. तर त्याची ही भूमिका लीलाची बहीण असलेल्या रेवतीच्या बॉयफ्रेंडची आहे. तर ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत अद्वैत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील साहिल या भूमिकेनंतर ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील विक्रांत ही भूमिका कशी वेगळी असेल? हे जाणून घेण्यासाठी त्याचे अनेक चाहते उत्सुक आहेत.
दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेआधीही त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘जाऊ नको दूर बाबा’, ‘अग्निहोत्र २’, ‘फुलपाखरु’ तसेच ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमधील त्याच्या भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडल्या होत्या. त्यामुळे आता अद्वैतला साहिलनंतर विक्रांतच्या भूमिकेत प्रेक्षकांकडून किती प्रेम मिळणार हे पाहण्यासाठी सगळे आतुर आहेत