आपल्या रोखठोक भूमिकांनी व दमदार भाषणांनी कायमच चर्चेत राहणारे नेते म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे हे सध्याच्या सक्रिय राजकारणात सहभागी नसले तरी त्यांच्या नावाच्या कायमच चर्चा होत असतात. अशातच त्यांचा मुलगा व मनसे विद्यार्थी सेनेचे राज्यप्रमुख अमित राज ठाकरे यांचीदेखील चर्चा होत आहे. अमित ठाकरे यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्राच्या राजकारणात सहभाग घेतला असून सध्या ते तरुणाईचं लक्ष वेधून घेत आहेत.
नुकताच ‘झी युवा सन्मान पुरस्कार २०२४’ हा सोहळा पार पडला असून यंदाच्या झी युवा नेतृत्व सन्मान या पुरस्काराने अमित ठाकरे यांना सन्मानित करण्यात आलं. त्यामुळे सोशल मीडियासह सर्व माध्यमांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. येत्या रविवारी ३१ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर ‘झी युवा सन्मान पुरस्कार’ सोहळा प्रसारित होणार आहे.
यावेळी आमित ठाकरेंना भविष्यात ते मुख्यमंत्री झाले तर तुम्ही कोणत्या गोष्टी बदलाल? असा प्रश्न विचारण्यात आला. यांचे उत्तर देत अमित ठाकरेंनी असं म्हटलं की, “खरंतर अशा खूप गोष्टी आहेत, ज्या मला बदलायच्या आहेत. लहानपणी आमच्या घरी खूप लोकं यायची. तेव्हा मी त्यांचे निरीक्षण करायचो. आई मला शाळेत घेऊन जायची किंवा मोठा झाल्यानंतर मी कॉलेजमध्ये वगैरे जायचो तेव्हा मी निरीक्षण करायचो की, लोकांच्या चेहऱ्यावर या राज्यात, शहरात राहण्याचे एक हसू व एक समाधान असायचे. ते आता दिसत नाही.”
यापुढे ते असं म्हणाले की, “आज आपण बाहेर जाऊन लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितले तर तुमच्या लक्षात येईल की लोकांच्या चेहऱ्यावरचं ते हसू गायब झाले आहे आणि ते हसू व समाधान मला परत आणायचे आहे. लोकांना या शहरात किंवा या राज्यात राहणे चांगलं वाटलंच पाहिजे आणि त्यांच्या या राज्यात किंवा या शहरात राहण्याबद्दलचे हसू मला पुन्हा आणायचे आहे.” दरम्यान, अमित यांच्या नावाला ‘ठाकरे’ आडनावाचं एक वलय असलं तरी आपल्या नेतृत्वगुण आणि वक्तृत्वशैलीने अमित ठाकरे यांनी तरुणाईमध्ये त्यांच्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. तसेच तरुणाईचाही त्यांना चांगलाच पाठिंबा मिळत आहे.
.