बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण अनेकदा चर्चेत असतो. बरेचदा आदित्य ट्रोलिंगची शिकारही झालेला पाहायला मिळाला. यावेळी भिलाईच्या कॉन्सर्टमुळे आदित्य नारायण चर्चेत आला आहे. या कॉन्सर्टमधून त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका चाहत्याला मारताना आणि त्याचा फोन हिसकावून फेकताना दिसत आहे. चाहत्याबरोबरची ही त्याची वागणूक पाहिल्यानंतर त्याच्यावर सगळीकडून टीका होत आहे. (Aditya Narayan Troll)
आदित्य नारायण छत्तीसगडमधील एका कॉलेजमध्ये कॉन्सर्ट आयोजित करण्यासाठी गेला होता. यावेळी अनेक संगीतप्रेमी उपस्थित होते. या व्हायरल व्हिडीओमध्ये आदित्य शाहरुख खानच्या ‘डॉन’ चित्रपटातील गाणे गाताना दिसत आहे. यादरम्यान आदित्यचा संयम सुटतो. व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, आदित्य गाणं गात असताना त्याचा एका चाहता परफॉर्मन्स रेकॉर्ड करत होता. आदित्य नेमका कशामुळे नाराज झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र तो त्याच्या चाहत्यावर हात उगारताना दिसत आहे. आणि त्यानंतर त्याने त्याचा फोन हिसकावून फेकून दिला.
आदित्य नारायणचे हे वाईट वर्तन पाहून तेथे उपस्थित प्रेक्षकही हैराण झाले. त्याच्या या कृतीवर सोशल मीडियावरही जोरदार टीका होत आहे. लोकांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे. एका यूजरने लिहिले आहे की, “आदित्य नारायणला काय प्रॉब्लेम आहे? एवढा गर्व कशाला? आपल्याच चाहत्यांचा इतका अनादर?”, तर दुसऱ्या यूजरने “तो स्वतःला काय समजतो?”, असा सवाल केला आहे.
या घटनेनंतर आदित्यच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सर्व पोस्ट त्याने लपवल्या आहेत. आधी त्याचे चाहते सर्व पोस्ट पाहू शकत होते, परंतु आता त्याने त्याचे सोशल मीडिया अकाऊंट खाजगी केले आहे. सगळीकडून ट्रोल झाल्यानंतर आता आदित्य नारायण घडलेल्या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देणार का?, याकडे साऱ्यांचा नजरा वळल्या आहेत.