अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आदिल खान दुर्रानीबरोबर लग्न नंतर घटस्फोट यामुळे ती विशेष चर्चेत आली. राखीने अदिलवर गंभीर आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार केली. त्यांनतर आदिलला राखीने केलेल्या गंभीर आरोपावरून अटकही झाली. काही महिने तुरुंगवास भोगल्यानंतर आदिलची सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिलने पत्रकार परिषद घेत राखीविरोधात पुरावे दाखवत आपली बाजू मांडली. यानंतर आता आदिलने राखीबाबत भाष्य केलं आहे. (Adil Khan Durrani On Rakhi Sawant)
बऱ्याच दिवसांनंतर आदिलचा राखीबाबत बोलतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ‘तू राखीला माफ करशील का?’ या प्रश्नावर उत्तर देत आदिलने स्पष्ट नकार देत भाष्य केलं. ‘इन्स्टंट बॉलीवूड’शी बोलताना आदिल खान म्हणाला, “मी राखीला कधीच माफ करणार नाही. तिने माझ्याबरोबर जे केलं ते खूप अती होतं. ती जर गप्प बसली असती तर एकवेळ मी तिला माफ करण्याचा विचारही केला असता. पण अजुनही ती माझी, माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे”.
आदिल पुढे म्हणाला, “तिला शक्य त्या सर्व वाईट गोष्टी ती माझ्याबद्दल करण्याचा प्रयत्न करत आहे. राखी माफीलायक नाही, ती खूप वाईट आहे. तिने माझं आयुष्य व करिअर दोन्ही धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावरील लोकांच्या प्रेमामुळे, त्यांच्या पाठिंब्यामुळे मी अजुनही जिवंत आहे, नाहीतर कधीच मेलो असतो”, असं त्याने सांगितलं.
या व्हिडीओवर राखी सावंतने कमेंट्स करत, “तो लोकांना स्वतःच्या फायद्यासाठी वापरतो. त्याने माझा वापर केला, आता तो शर्लिन चोप्रा व राजश्रीचा वापर करत आहे. या व्यक्तीबरोबर माझं नाव घेऊ नका, माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही. हा वाईट माणूस आहे, माझं नाव वापरणं बंद कर” असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. राखी सावंत व आदिल खान दुर्रानी ‘बिग बॉस १७’मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही जोरदार सुरु आहेत.