‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा या सीझनकडे लागून राहिल्या आहेत. यंदाच्या सीजनमध्ये अभिनेते, कीर्तनकार, गायक, रॅपर, रीलस्टार यांनाही सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यामुळे यंदाचं हे पर्व अधिकच रंगतदार झालेलं पाहायला मिळालं. आपापला प्रवास सांगत प्रत्येकजण उत्तम खेळ खेळताना दिसत आहेत. तर यंदाच्या पर्वामध्ये वर्षा उसगावकर, पंढरीनाथ कांबळे, निखिल दामले, जान्हवी किल्लेकर हे चार कलाकार मंडळी सहभागी झाले आहेत. या कलाकारांचा अनोखा प्रवास पाहणं खूपच रंजक ठरतं आहे. (Vishakha subhedar support paddy kamble)
दरम्यान पहिल्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे या स्पर्धकाचा तितकासा सहभाग नसल्याने रितेश देशमुखने ‘भाऊचा धक्का’मध्ये पंढरीनाथ कांबळेची चांगलीच शाळा घेतली. प्रेक्षक म्हणून नाहीतर स्पर्धक म्हणून तू घरात खेळायला आला आहेस त्यामुळे बघ्याची भूमिका न घेता व्यक्त हो असं सांगत त्याची चांगलीच कान उघडणी केलेली पाहायला मिळाली. त्यावेळी पॅडीने आपली बाजू मांडत खेळण्यास सुरुवात करण्याचंही सांगितलं.
आजवर पंढरीनाथ कांबळेने सिनेसृष्टीत त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतर आता पंढरीला त्याची सिनेसृष्टीतील जुनी मैत्रीण अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी पाठिंबा दिला. मैत्री दिनादिवशी विशाखा सुभेदारने पॅडीसाठी खास पोस्ट शेअर केलेली पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी पॅडीला ‘बिग बॉस’च्या घरात खेळण्यासाठी सपोर्टही केला. शिवाय फ्रेंडशिप डेला पॅडी बरोबर नसल्याने तिने मैत्री दिनाच्याही शुभेच्छा देत त्याची आठवण काढली आहे.
विशाखाने खास पोस्ट शेअर करत, “हॅपी फ्रेंडशिप डे मित्रा. तू तिथे त्यांच्या सारखा नसलास तरीही तू खुप खरा आहेस. वेगळा आहेस. सज्जन आहेस. तारेवरची कसरत तुला कायमच जमली आहे. तिथेही तू मैत्री कर आणि ती निभव. तुझ्यातील चांगले गुण दाखवून दे. गप बसू नकोस. यारों का यार हैं तू. तुझ्या माणसांच्या मदतीसाठी तू उभा असतोस आज स्वतः साठी उभा रहा. मित्रा”, असं म्हणत त्याला खेळ खेळण्यास प्रोत्साहित केलं आहे.