‘बिग बॉस’चे घर आणि घरातील भांडणं हे समीकरण ‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वात पहायला मिळतं. घरात प्रत्येक दिवशी स्पर्धकांमध्ये काहीना काही कारणावरुन भांडणं आणि वाद हे होतच असतात. गेल्या आठवड्यात वर्षा-निक्की व आर्या-जान्हवी यांच्यात झालेले राडे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पहिला आठवडा चांगलाच गाजला. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले. आता दुसऱ्या आठवड्यातही १५ सदस्यांची ‘कल्लाकारी’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या आठवड्यात जे सदस्य शांत होते ते सदस्य कदाचित दुसऱ्या आठवड्यात भिडताना दिसून येतील. त्यामुळे ‘बिग बॉस’प्रेमींचं नॉन स्टॉप मनोरंजन होणार आहे.
अशातच आता ‘बिग बॉस’च्या एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यात घरातील सगळेच स्पर्धक एकमेकांमध्ये जोरदार भिडलेले पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’ने दिलेल्या नवीन currency टास्कवरुन या सदस्यांमध्ये भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच आलेला हा प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या प्रोमोमध्ये घरातील लाइट्स बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’ने घरातील स्पर्धकांना रात्री हा नवीन टास्क दिला आहे.
या नवीन प्रोमोवरुन ‘बिग बॉस’ने घरातील स्पर्धकांना ‘बिग बॉस’ currency शी संबंधित काहीतरी टास्क दिल्याचे कळत आहे. यावरुन घरातील स्पर्धकांमध्ये currency वरुन जोरदार वाद होतात आणि या वादामध्ये सर्वांचाच पारा चढतो. यांमध्ये गेल्या आठवड्यात शांत असलेले पॅडीही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर अभिजीतलादेखील त्याला राग अनावर झाल्याचे या प्रोमोमधून दिसून येत आहे.
दरम्यान, या नवीन प्रोमोमध्ये प्रेक्षक एकमेकांना धक्काबुक्की करत असून currency टास्कसाठी घरातील सर्वच स्पर्धकांमध्ये हाणामारी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या टास्कमध्ये कोण कुणावर भारी पडणार? कोण कुणाला धक्काबुक्की करणार? आणि नेमका कुणामध्ये कसा राडा होणार? हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.