नव्या वर्षाला अगदी जोरदार सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीसाठीही हे नवीन वर्ष उत्तम असणार असल्याचं चिन्ह दिसत आहे. कारण येत्या नवीन वर्षात उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. उत्तम कथा असणारे चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘पंचक’. माधुरी दीक्षित व श्रीराम नेने प्रस्तुत या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. (Tejashri Pradhan In Panchak)
‘पंचक’ चित्रपटाचा ग्रँड प्रिमियर सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी तेजश्रीही उपस्थित होती. दरम्यान तेजश्रीने या चित्रपटाबाबत आणि चित्रपटामधील भूमिकेबाबत ‘इट्स मज्जा’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. चित्रपटाबाबत बोलताना तेजश्री म्हणाली, “नवीन वर्ष सुरु होता होता माझा नवीन चित्रपट येत आहे. माधुरी दीक्षित मॅम साक्षात माधुरी दीक्षितच आहेत. तुम्हाला विश्वास बसेल की नाही माहित नाही पण आज मी पहिल्यांदा माधुरी दीक्षित मॅम आणि नेने सरांना भेटले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण झालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही”.
यापुढे तिला “चित्रपटासाठी निवड कशी झाली?” असा प्रश्न तेजश्रीला विचारण्यात आला. यावेळी ती उत्तर देत म्हणाली की, “मला झाड बनवलं तरी चालेल मी करते हा चित्रपट असं मला त्यावेळी वाटलं होतं. माधुरी स्वतः मराठीमध्ये चित्रपट करत आहेत हा एक योगायोग होता. वेगळ्या धाटणीचा विषय सुंदर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटामधून केला आहे. त्यामुळे विचार न करता लगेचच चित्रपटासाठी मी होकार कळवला.”
विशेष म्हणजे चित्रपटाच्या ग्रँड प्रिमियर सोहळ्याला तेजश्रीच्या ड्रेसचीच सर्वाधिक चर्चा रंगली. तिने परिधान केलेला पिवळ्या रंगाचा ड्रेस अगदी हटके होता. दरम्यान, या चित्रपटात तेजश्रीसह आदिनाथ कोठारेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ५ जानेवारीला ‘पंचक’ चित्रपटगृहामध्ये दाखल होईल. त्यामुळे या चित्रपटाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. माधुरी दीक्षितसह तेजश्रीचे अनेक चाहते या चित्रपटासाठी आतुर आहेत.