Swanandi Berde On Laxmikant Berde : महाराष्ट्राचे लाडके जेष्ठ विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे जरी आपल्यामध्ये नसले तरी ते प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये जिवंत आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने फक्त मराठी माणसालाच नाही तर संपूर्ण भारतीयांना त्यांच्या विनोदी अभिनयाचे वेड लावले. या अवलियाने आपल्या अनोख्या शैलीच्या जोरावर लोकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या अभिनेत्याला वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वजण ‘लक्ष्या’ या नावानेच आजही बोलतात. कारण हा अभिनेता सर्वसामान्य लोकांना आपलासा वाटतो. ते त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात. लक्ष्मीकांत यांनी कमी वयात जगाचा निरोप घेतला. पण चाहत्यांच्या मनात ते आजही जीवंत आहेत. लक्ष्मीकांत यांच्या आठवणीत अनेक कलाकारही भावुक होताना पाहायला मिळतात.
लक्ष्मीकांत यांनी अभिनेत्री प्रिया बेर्डेशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं असून त्यांची दोन्ही मुलं सिनेविश्वात कार्यरत आहेत. अभिनेत्री स्वानंदी बेर्डे व अभिनेता अभिनय बेर्डे हे दोघेही सिनेविश्वात कार्यरत आहेत. आई-वडिलांच्या पाठोपाठ ही मुलं उत्तम काम करताना दिसत आहेत. दर्जेदार चित्रपटांमधून अभिनयने काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर स्वानंदी ही तिच्या अभिनयाने रंगमंच गाजवताना दिसत आहे. आज लक्ष्मीकांत यांना जाऊन २० वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच वडिलांच्या आठवणीत लेक स्वानंदीने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
“२० वर्षे उलटून गेली पण बाबा तुमच्या आठवणी अजूनही ज्वलंत वाटतात. तुमचा दयाळूपणा, विनोद आणि अतूट प्रेमाने मी आजच्या व्यक्तीला आकार दिला आहे. इतक्या वर्षांनंतरही तुमचे प्रशंसक, शुभचिंतक तुमच्या कामाची, करिष्माची आणि विनोदाची प्रशंसा करत आहेत. तुम्ही सर्वांवर जबरदस्त छाप सोडली आहे. आपण मागे सोडलेल्या अविश्वसनीय वारशासाठी धन्यवाद. मी दररोज तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मला तुझी खूप आठवण येते. तुमची अनुपस्थिती ही आम्ही गमावलेल्या मौल्यवान वेळेची सतत आठवण आहे. पण तुमचा आत्मा आहे आणि बाबा पुन्हा भेटेपर्यंत मला आयुष्यातील आव्हानांमध्ये मार्गदर्शन करत आहे”, असं कॅप्शन देत तिने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांच्या निधनाने बॉलिवूडकर हळहळले, सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला शोक
स्वानंदीच्या या पोस्टवर अनेकांनी लाईक्स व कमेंटचा वर्षाव केला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ‘झपाटलेला’, ‘धुमधडाका’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘अफलातून’ असे कित्येक चित्रपट आजही तितक्याच आवडीनं पाहिले जातात आणि त्यामुळे लक्ष्मीकांत यांची लोकप्रियता आजही कायम आहे.