‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनमधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरांत पोहोचले. ‘पप्पी दे पारुला’ म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशातच अभिनेत्रीवर नुकताच दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या जवळच्या एका खास व्यक्तीचं निधन झालं असून सोशल मीडियाद्वारे स्मिताने यासंबंधित माहिती दिली आहे. श्री रमेश अश्वथराव गोंदकर असं त्यांचं नाव असून स्मिताने त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
स्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ही माहिती दिली आहे. स्मिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिने असं म्हटलं आहे की, “अत्यंत दुःखाने व जड अंत:करणाने आम्ही तुम्हाला कळवत आहोत की आमचे लाडके श्री रमेश अश्वथराव गोंदकर यांचे काल ४ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले. आम्ही आमचे दु:ख आता शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण ते आमच्या कायम स्मरणात राहतील”

याबरोबर तिने त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दलचीही माहिती दिली आहे. त्यांच्या अचानक निघून जाण्याने अभिनेत्रीला दु:ख अनावर झाले असून त्यांच्या निधनावर स्मिताने शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीही वाहिली आहे.
दरम्यान, स्मिता नुकतीच बलोच या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला आली होती. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच स्मिताच्या जवळील खास व्यक्तीच्या निधनावर सर्वांनीच दु:ख व्यक्त केलं आहे.